Showing posts with label pune. Show all posts
Showing posts with label pune. Show all posts
Home » Posts filed under pune
Saturday, 26 October 2019
घरातून रोज कॉलेजला जाताना मला विविध गोष्टींचं दर्शन होतं. रोजचाच रस्ता
असल्याने रस्त्यावरील एकएक गोष्ट नजरेत बसते. खड्डयांच्या गर्दीमध्ये हरवलेला
रस्ता, फुटपाथवर झालेलं अतिक्रमण, ऐन कामाच्या वेळी लागलेलं
ट्रॅफिक, पीएमपीच्या दारात लोंबकळणारे प्रवासी, दिवसाढवळ्या चालू असलेले पथदिवे असे अनेक 'प्रॉब्लेम्स'
रोज पाहायला मिळतात. मी पत्रकारितेचा विद्यार्थी असल्याने या समस्या
मनाला अधिक लागतात. वरवर या साध्या दिसत असल्या तरी पुणेकरांना यांचा प्रचंड
प्रमाणात त्रास होतो. माध्यमंही या समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे
मोठंच प्रश्नचिन्ह आहे. सारासार विचार केला तर या समस्यांवर कोणाकडेच ठोस उत्तर
नाहीये, पण किमान पुणे शहरात या समस्या अस्तित्वात आहेत याची
जाणीव तरी सर्वांना व्हायला हवी.
वृत्तपत्रांतून 'वाचकांचा पत्रव्यवहार'मधूनच यांसारख्या बातम्या
आपल्याला कळतात, पण दृक्श्राव्य माध्यमांवर यांसारख्या
विषयांची वानवाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची नितांत
गरज आहे. सध्याच्या या डिजिटल युगात योग्य पर्यायाची निवड करणं क्रमप्राप्त आहे,
आणि म्हणूनच तीन मित्रांनी एकत्र येऊन 'न्यूजलूक'
(Newslook) या 'सिटिझन जर्नालिझम'वर आधारित ॲपची निर्मिती केली आहे. प्रतिक मासुळकर, रोहित गिते, अक्षय नारखेडे या तरुणांनी वाचकांचा पत्रव्यवहार
म्हणजेच Letters to
the Editor याच्यापुढे जाऊन, आजच्या डिजिटल युगात या ॲपच्या माध्यमातून भक्कम
पाऊल टाकलं आहे.
रस्त्यावरून जाताना दिसलेली कुठलीही समस्या असेल, लगेच त्याचं छायाचित्र
किंवा व्हीडिओ काढून या ॲपवर टाकता येतो. कोणतंही छायाचित्र किंवा व्हीडिओ जतन
करून नंतर वापरण्याची या ॲपमध्ये सोय नसल्याने हेच या ॲपचं वेगळेपण आहे. यातूनच
पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली 'विश्वासार्हता' जपली जाते. छायाचित्र किंवा व्हीडिओ पोस्टमध्ये समाविष्ट करणं बंधनकारक
असल्याने या ॲपवर 'फेक न्यूज' पोस्ट
करता येत नाही. याचबरोबर छायाचित्रं आणि व्हीडिओला कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन द्यावं
लागतं. थोडक्यात सांगायचं तर या ॲपमुळे आता लोकांच्या 'खऱ्या
समस्या' समोर येणं सोपं होणार आहे.
ही सर्व झाली या ॲपची माहिती. पण या ॲपमुळे नक्की काय परिणाम साध्य होत आहेत
की होणार आहेत हेही आपण पाहायला हवं.
सामान्य नागरिकांच्या हातात 'न्यूजलूक'च्या माध्यमातून एक अनोखी ताकद
आली आहे. कुठल्याही वृत्तसंस्थेला कोणाचे तरी पाठबळ असतं त्यामुळे कदाचित त्या
वृत्तसंस्थेवर, काम करण्याच्या शैलीवर फरक पडतो पण 'न्यूजलूक' या बाबतीत फार वेगळं आहे. टीआरपीचे गणित
आणि कोणत्याही आयडोलाॅजीचे पाठबळ नसल्याने सर्वसमावेशक न्यूज कंन्टेट आपल्याला 'न्यूजलूक'वर पाहायला मिळतो.
आपल्या आयुष्यात आपल्याला कुठल्याही आपत्तीला कधीही सामोरं जावं लागतं.
आत्ताचंच उदाहरण घेतलं तर पुण्याच्या दक्षिण भागात म्हणजेच कात्रज, लेकटाऊन
परिसरात अंबिल ओढयाला पूर आला होता. अशावेळी नागरिकांना तातडीच्या आणि गरजेच्या
सूचना द्यायला कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दुर्दैवाने व्हाॅटसप आणि बाकीच्या
सोशल ॲपवरूनही काही दिसत नव्हतं. यांसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत 'न्यूजलूक' सारख्या ॲपचा नक्कीच उपयोग होईल. नागरिकच,
नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत सूचना, संदेश
देतील. कुठे रस्ता बंद केलाय, कुठले रस्ते टाळले पाहिजेत,
कुठे मदतीची गरज आहे यांसारख्या प्रश्नांना या ॲपवरून थेट उत्तर
मिळणार आहे.
या ॲपचा आणखी एक परिणाम म्हणजे लोकं आपल्या समस्या मांडणार आणि बाकीचे त्या
समस्यांचं लवकरात लवकर कसं निराकरण होईल हे पाहणार. यातूनच वेगवेगळे स्थानिक
समुदाय बनतील. हेच समुदाय लोकांसाठी काम करतील, लोकांच्याच विकासाचा विचार करतील. 'स्थानिक ते स्थानिक' असा प्रवास नक्कीच पुणे शहराला
एक नवीन दिशा मिळवून देईल यात शंका नाही.
शेवटी फक्त एकच सांगणं आहे, की हे ॲप जरूर वापरून पहा. कुठलीही गोष्ट वापरून किंवा जवळून
पाहिल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल काहीतरी मत बनवणं चुकीचे आहे. त्यामुळेच एकदा
वापरा, नीट अनुभवा आणि आम्हाला नक्की कळवा!
खालील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर लिंकही
दिली आहे. तसेच तुम्ही आमच्याशी फेसबुक, इन्स्टाग्राम यावरूनही कनेक्ट होऊ शकता.
त्याच्याही खाली लिंक्स दिलेल्या आहेत.
इन्स्टाग्राम: https://instagram.com/newslookpune?igshid=1jtxfxg7i5vxc
वेबसाइट: www.newslookmedia.com
ई-मेल: info@newslookmedia.com
Sunday, 26 August 2018
पोहे आणि मी!
08:28 mayur wagh
पुण्यात राहून जर पोहे आवडत
नसतील तर पुणेकर असल्याचा खोटा अभिमान कोणीही बाळगू नये असे माझे प्रेमळ मत आहे.
पुणेकरांच्या आयुष्यात दिवसाची सुरुवात चहाने झाल्यावर नंतर पोहेच असतात. पुणेकर
असल्यामुळे हीच सवय मलाही आहे. शालेय जीवनापासून मी पोहे खायला सुरुवात केली आणि
तेव्हापासूनच पुणेकर आणि पोहयांचे नाते किती घट्ट आहे याची जाणीव मला झाली.
मी आठवीत असताना
'प्रबोधिनी'जवळच असलेल्या 'उभे' या ठिकाणी पोहे खायचो. गरमागरम चविष्ट सांबर, वर
असलेली पिवळी, लाल शेव आणि द्रोणातील चवदार पोहे या गोष्टींमुळे माझा पोहयांकडे
ओढा वाढला. दररोज एकदातरी उभेचे पोहे व्हायचे. काही वेळा घरून डबा मिळायचा नाही मग
तेव्हा मधल्या सुट्टीत उभेचे पोहे असायचे. साधारण दहावी पर्यंत मी फक्त तिकडचेच
पोहे खायचो.
अकरावी-बारावीला जास्त
पोहे खायची वेळ आली नाही. ठिकाण बदलल्यामुळे आणि एखाद्याच गोष्टीची आवड निर्माण
झाल्यामुळे दुसरीकडे पोहयांची चव ट्राय करायचे धारिष्ट्य केले नाही. पण नंतर
फर्ग्युसनला आल्यामुळे नवीन चवी ट्राय करणं मस्ट झालं. म्हणूनच चहाच्या टपरीवर
चहाबरोबरच पोहे देखील सुरू झाले. यातच एक पोहयाचे नवीन काहीसे व्हर्जन म्हणता येईल
असं खाण्यात आले. आम्ही त्यावेळीस सिंहगड रोडला मित्राच्या घरी रात्री अभ्यास
करायला जमायचो. अभ्यासाला जरी जमत असलो तरी खरं कारण वेगळंच असायचे. पहाटे तीन
वाजता पोहे खायला आम्ही कमिन्स काॅलेजजवळ जायचो. गरमागरम मटकी सॅम्पल आणि वरती
लिंबू पिळलेले पोहे हे पहाटे पहाटे खूप खास लागायचे. आमचे क्वचितच घरी लवकर
गेल्यामुळे ते पोहे चुकलेले आहेत पण मुद्दामून त्यांच्यासाठीच रात्र जागवल्याचेही
मला आठवत आहे.
कमिन्स बरोबरच कधी लवकर
पोहे खावेसे वाटले म्हणजेच १२-१२.३० ला तर कोथरूडला देसाई बंधू आंबेवाल्यांच्या
इथे पोहे खायला जायचो. तिकडच्या पोह्यांची चव ओके ओके आहे. कमिन्सच्या आधी
अमृतेश्वराला पहाटे पोहे खायला जायचो कारण तेव्हा आम्हाला कमिन्सचा स्पाॅट माहित
नव्हता आणि नंतर पुढे पुढे अमृतेश्वराच्या पोहयांची सुद्धा टेस्ट बिघडली.
कॉलेजच्या खासकरून शेवटच्या वर्षात भरपूर वेळा कमिन्सवर स्वारी असायची पण नंतर
एकदा काॅलेज संपलं आणि ती जागा सुटली.
सध्यातरी आयुष्यात पोहे
फक्त घरी खाऊन होतात. मी प्रबोधिनीचाच असल्यामुळे उभेला फक्त प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनीच भेट होते. पण
कधी चुकून गेलो तरी आठवीतले आणि आठवणीतले दिवस आठवतात आणि तेव्हाचीच चव जिभेवर
रेंगाळते.
ता. क. मला उत्तमप्रकारे
पोहे करता येतात आणि मी ते करतोही पण एकदा घरी एकटा असताना अंदाज न आल्यामुळे 'य'
प्रमाणात पोहे केले आणि मग त्या दिवशी दिवसभर मी फक्त पोहेच खात होतो. त्यामुळेच
मी पोहे करायचे टाळतो! मला आवडणारे पोहे कुठे कुठे मिळतात या जागांची यादी पुढे
देऊन ठेवतोय, तिकडचे पोहे कसे वाटले ते जरूर मला कळवा. मी वाट पाहतोय!
इकडचे पोहे मला आवडतात!
- उभे स्पोर्ट्स, ज्ञान प्रबोधिनी जवळ, राधिका भेळ
च्या शेजारी.
- कमिन्स काॅलेजजवळ (योग्य पत्ता लवकरच अपडेट करतो)
- देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रोड, कोथरुड. (वेळ बघून जावे,
दिवसाढवळ्या फिरकू नये)
- वैष्णवी स्नॅक्स सेंटर, एचपी पेट्रोल पंपाच्या
शेजारी, जंगली महाराज रोड.
Saturday, 18 August 2018
चहा आणि मी!
08:05 mayur wagh
माझ्या
जीवनात चहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळची सुरुवात चहाने झाली की माझे
दिवसभरात 3-4 चहा होतात. दिवसभर बाहेर
असल्यामुळे सकाळचा आणि कधीतरी संध्याकाळचा चहा घरी होतो. चहाचे हे 'गोड' व्यसन काॅलेज लाईफ सुरू
झाल्यावर लागले आणि यात माझ्या मित्रमंडळीचा फार मोठा वाटा आहे. रोजच्या घडणाऱ्या
विविध विषयांवरच्या चर्चा, कमाल लेव्हलचे गाॅसिपिंग आणि त्याच्या जोडीला
फक्कड चहा यातच माझे काॅलेज जीवन सामावलेले आहे.
मी
अकरावी-बारावीला आबासाहेब गरवारेला आर्टस् करत होतो. रेस्ट इअर असल्यामुळे
काॅलेजला जाणे फारसे व्हायचे नाही. पण कधीतरी चुकून गेलो तरी गरवारेच्या बाहेर
असलेला चहा हमखास व्हायचा. नंतर पुढील शिक्षणासाठी मी फर्ग्युसन घेतले. तिथेच खरे
अस्मादिकांना चहाचे व्यसन लागले. मीडियाचे विद्यार्थी असल्यामुळे 'य' प्रमाणात चर्चा व्हायच्या
आणि त्याला ठिकाण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन! तिकडचा चहा फिका वाटत असला तरी चहाची ती
चव मला आवडते. आणि मग नंतर फर्ग्युसनच्या चौथ्या गेटपाशी असलेल्या चहाच्या टपरीवर
रोजचा चहा व्हायचा. ते ठिकाण निवडण्यामागचे कारण म्हणजे माझ्या डिपार्टमेंटची
बिल्डींग त्याच्या जवळ होती आणि खरे कारण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन फार लांब होते
आणि त्याला चालत जायचा मी कंटाळा करायचो.
असं
चहाचे ठिकाण निश्चित झाल्यावर कधीतरी सकाळी, दुपारी लेक्चर झाल्यावर आणि
मग संध्याकाळी कॉलेज झाल्यावर चहाचे प्रोग्राम व्हायचे. फर्ग्युसन मधले माझे
जवळपास निम्मे आयुष्य मी त्या चहाच्या टपरीवरच व्यतीत केले. एकूणतः फर्ग्युसन मुळे
माझे चहाप्रती असलेले प्रेम अधिक वाढले.
आता
फर्ग्युसनमधून मी रानडे मधे पुढील शिक्षणासाठी आलोय आणि त्याचबरोबर आलंय माझे
चहाबद्दलचे प्रेम! इथे सध्याच आल्यामुळे इकडे असलेल्या चहाच्या वेगवेगळ्या टपऱ्या
मी फक्त ट्राय करतोय. पण अजूनही माझ्या जिभेवर फर्ग्युसनच्या बाहेर असलेल्या
चहाच्या टपरीवर असलेल्या चहाचीच चव रेंगाळत आहे.
ता.क.
मला उत्तम प्रकारे चहा करता येतो पण मी तो करायचा कंटाळा करतो याची वाचकांनी नोंद
घ्यावी! तसेच मला आवडणार्या चहाच्या जागांची यादी मी पुढे दिलेली असून तिकडचा चहा
तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला कळवा, मी वाट पाहतोय!
इकडचा
चहा मला आवडतो!
- फर्ग्युसनमधले अण्णाचे कॅन्टीन.
- फर्ग्युसनच्या चौथ्या गेट बाहेरील
चहाची टपरी.
- येवले चहा, हत्ती गणपती समोर.
- जय भोलेनाथ टी हाऊस, पत्र्या मारूती चौक.
Subscribe to:
Posts
(
Atom
)


