प्रेमाचा दिवस वगैरे वगैरे..
आज व्हॅलेन्टाईन..प्रेमाचा दिवस! प्रेम व्यक्त
करण्याचा दिवस वगैरे वगैरे. पण खरंच व्यक्त करता येतं का हे प्रेम? का व्यक्त न होता, आत कुठंतरी खोलवर, चिखलात रूतून पडलेल्या
कर्णाच्या रथाच्या चाकासारखं होऊन बसतं. बाहेर निघायचं असतं पण निघणंच अवघड होऊन
जातं. खूप काही बोलायचं असतं पण नाही बोलता येत. कितीही प्रयत्न केले तरी शक्य
नाही होत. एक वेगळीच अनामिक भीती मनात दाटते. खरंच कळत नाही अश्यावेळी. एकाबद्दल
आपल्याला काहीतरी वाटतंय आणि ते त्याला स्पष्टपणे सांगता येत नाहीये, हाच कदाचित नात्याचा
कमकुवतपणाही असेल पण यामागे अनेक वेगळीही कारणं असतात.
आपल्याला समोरच्याबद्दल जे मनापासून वाटतंय, जाणवतंय ते काही वेळासाठी आहे का आयुष्यभरासाठीचं आहे, प्रेम आहे पण दाखवण्याची कृती होत नाहीये का, समोरच्याबद्दलची जाणीव भूतकाळातील गोष्टींमुळे निर्माण झाली आहे का, आपल्या आयुष्यात कोणीच नाही म्हणून कोणीतरी असं आहे का, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवंय का अश्या अनेक प्रश्नांनी प्रेम व्यक्त करणं अशक्यप्राय होऊन बसतं. आपण आपल्या आयुष्यात त्या व्यक्तींशी रोज बोलतोय, त्यांना सारखं भेटतोय, दिवसभर काय केलं याचा इतिवृत्तांत देतोय अशा व्यक्तींना मला तुमच्याविषयी काहीतरी जाणवतंय हे कसं व्यक्त करायचं?
मला माहितीये अनेकांचं प्रेम फार नितळ असतं, अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेसारखं. डायरेक्ट मेघापर्यंत पोहचलेलं. समोरच्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारं. Space आणि time विसरून मनसोक्त बागडणारं. स्वतःच्या विरहात समोरच्याचा आनंद पाहणारं. पण हे व्यक्त करायचं म्हटलं तर नाही होत आपल्याकडून. त्यासाठीचं धाडस कुठून आणायचं नाही कळत. Patience हवा, आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं, हे काय वय आहे का प्रेमात पडायचं, संस्कार कुठे गेले फिरायला, हे जर बाहेर कळलं तर समाज काय म्हणेल यांसारख्या वाग्बाणांनी तुम्ही अधिक घायाळ होता. मग काय कमीपणाची भावना आणि नुसता प्राक्तनाला दोष. नैराश्य खायला उठतं अश्यावेळी.
काहीजण हे सगळं सहन करतात, काहीजण हेच आपलं प्राक्तन म्हणून याचा स्वीकारही करतात पण काहीजण स्वतःचं आयुष्य संपवायलाही मागंपुढं पाहात नाही. आपल्याला नाकारल्याची भावना आपण सहन करू शकणार नाही म्हणून कदाचित. कोणापुढेच ते बोलत नाही. प्रेम व्यक्त करायला अवघड जातंय म्हणजे प्रेम करायला किती अवघड गेलं असेल याची कल्पना पण करता येत नाही.
खरंच केवढं विचित्र आहे ना हे सगळं? प्रेम व्यक्त करण्याची भीती जीवघेणी कधी होते हेच कळत नाही. एवढी सुंदर भावना क्षणात नकोशी होती. आता काहीजण म्हणतील की बोलून मोकळं व्हायचं. तुमचा नात्यावर, समोरच्यावर आहे ना विश्वास तर तुम्हाला मोकळं व्हायला काहीच अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. पण तुम्ही एकदा स्वतःला विचारा खरंच ते शक्य आहे का? (मला माहितीये की इथे प्रत्येकजण आपापली लढाई लढतोय. तेव्हा माझी लढाई केवढी मोठी किंवा बघा मी किती जखमा झेलल्या आहेत असं माझा रोख नाहीये) आणि जर एखादा व्यक्ती असेल भावनाशील तर त्याने काय करायचं? निम्मं आयुष्य रडण्यात जाईल त्या बिचार्यांचं. आणि Practical विचार करायचा म्हटला तर स्वतःशीच प्रतारणा. नक्की करायचं काय अश्यावेळी?
आपल्या आयुष्यात प्रेमात पडणं फार सोप्पं आहे असं म्हणतात आणि ते टिकवणं अवघडे असंही म्हणतात. पण मला काय वाटतं की प्रेम व्यक्त करणं अधिक अवघडे. सामाजिक चौकटीत आपण एवढं गुरफटून गेलोय की मला तुझ्याबरोबर वेळ घालवायला आवडतो हे बोलायलाही वेळ मिळत नाही. काहीवेळा आपण लगेच bore होतो. समोरच्याचा वीट येतो, नात्याचा वीट येतो. बदल लागतो आपल्याला. अश्यावेळी व्यक्त का व्हायचं असंही होतं. पण तेव्हा आपण खूपच स्वार्थी होतोय का याचं आत्मपरिक्षण एकदा करायला हवं. असो. मला अनेक प्रश्न पडले आहेत. आणि याचाच मी कित्येक दिवस विचार करतोय आणि काल मध्यरात्री मला हे सगळं थोडंफार शब्दात बांधता आलंय.
आज प्रेमाचा दिवस, प्रेमाचा दिवस म्हणून गवगवा करण्याआधी निस्सीम प्रेम करून, निर्भीडपणे व्यक्त करण्याची धमक अंगात असली पाहिजे एवढं मात्र नक्की! प्रेम करताना दाखवलेलं धाडस, व्यक्त करतानाही दाखवायला हवं आणि यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला वर पडलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर माहीत नाही पण तुमचा तुमच्यावर विश्वास असेल आणि समोरच्याबद्दल असलेली जाणीव, भावना टिकवून ठेवण्याची मनापासून इच्छा असेल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल!
Surekha shabdankan
ReplyDeleteधन्यवाद :)
Delete