विघ्नहर्ता!

Wednesday, 26 August 2020

विघ्नहर्ता!




आज गणेश चतुर्थीनंतरचा पाचवा दिवस. आमच्या घरच्या गणपतीचं आज विसर्जन. दरवर्षी बाप्पा जाताना डोळ्यांमधे अश्रू देऊन जातो पण आज पहिल्यांदाच  डोळ्यांमधे आनंदाश्रू आहेत. आमचे सगळे विघ्न हरून बाप्पा त्याच्या घरी चालला आहे. खरंतर त्याला निरोप द्यावासा वाटत नाहीये कारण एवढ्या मोठ्या संकटातून त्याने आमची सुटका केलीये. आज मला पहिल्यांदाच मूर्तीमागच्या खऱ्या देवत्वाची जाणीव झालीये. असो. आता हे विघ्न नक्की कोणतं होतं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.


९ ऑगस्ट २०२० रोजी माझ्या वडिलांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली. सकाळी सकाळीच वाॅर्ड ऑफिसमधून फोन आला आणि बाबांचे नाव पाॅझिटिव्ह असलेल्या लोकांच्या यादीत आहे असं कळलं. खरंतर हा खूप मोठा धक्का होता. चार पाच दिवसांपूर्वीच त्यांना ताप येत होताजात होता पण कुठेही हा कोरोना असेल असं जाणवत नव्हतं. सगळे रिपोर्टस नाॅर्मल होते. अगदी छातीचा एक्स रे ही. कारण बाबा जास्त बाहेर पडायचे नाही. अगदी ऑफिसला जाणंही त्यांनी अलीकडेच सुरू केलं होतं. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली तिला स्वीकारणेही गरजेचं होतं. मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे मीआई आणि दिदीने विचार केला की बाबांना घरीच विलगीकरणात ठेवायचं. कारण लक्षणं सौम्य होती. तेव्हा बाहेरच्या परिस्थितीचाही विचार केला. अनेक रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत अशा पार्श्वभूमीवर आपल्याकडे गृह विलगीकरणाची व्यवस्था असताना कशाला कोणाची जागा अडवायची. बाबाही तयार झाले. खरंतर ते टेस्ट करण्यापूर्वीच म्हणजे तीन-चार दिवसांआधीच वेगळे राहत होते.

 

मग नंतर Contact ट्रेसिंगसाठी पोलिसांचे फोन आले. त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी आम्हालाही टेस्ट करून घ्यायला सांगितली. मग लगेचच आम्ही घराजवळच असलेल्या शरद पवार बहुउद्देशीय हाॅल कोविड तपासणी केंद्रावर गेलो आणि स्वॅब देऊन आलो. खरंतर आम्हाला कोणतीच लक्षणं नव्हती. पण काय माहित एक वेगळीच अनामिक भिती तेव्हा वाटत होती. आपण सगळं जर पाॅझिटिव्ह आलो तर बाबांकडे कोण बघणारत्यांच्या जेवणाचं काय. शेजारचे असले तरी आपलं माणूस आपल्याजवळ असेल तर अधिक धीर वाटतो, Willpower वाढते त्यामुळेच आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्हच यावेत असं मनापासून वाटत होतं आणि खरंच ते निगेटिव्ह आले.

 

पण मग एके दिवशी बाबांना चक्कर यायला लागलीडोकंही प्रचंड दुखत होतं. मग जवळच्याच डाॅक्टरांना दाखवलं तर त्यांनी छातीचा एक्स रे काढायला लावला तर त्यात न्यूमोनियाची सुरवात झालेली दिसली. आम्ही परत हादरून गेलो. तेव्हा माझ्या दोन काकांनी धीर दिला. त्यांनी त्वरित निर्णय घेतले आणि जवळच्याच हाॅस्पिटलमधे बाबांना ॲडमिट केलेतुम्ही कसलीच काळजी करू नकावाघ लवकर बरे होतील अशा सकारात्मक बोलण्यातून त्यांनी आमचं मन अधिक खंबीर केलं. आमच्या घराजवळच्या मेडिकलवाल्या दादानेही मोठी मदत केली. गरजेवेळी घरपोच औषधे देणं असेलतुम्ही पैसे नंतर द्याआपलं घरचंच दुकान आहे असा विश्वासक सूर असेल त्याने कधीही आम्हाला नकार दिला नाही.   

 

बाबांना हॉस्पिटलमधे ॲडमिट केल्यावर आमची खरी परीक्षा सुरू झाली. बाबांना सकाळी काढाथोड्यावेळाने नाष्टामग दुपारी जेवणसंध्याकाळी चहा मग रात्रीचं जेवण अशा माझ्या भर पावसातल्या फेर्‍या सुरू झाल्या. घरी आई आणि दिदीचीही कसरत चालू होती. आधी बाबांसाठी बनवून मग आमच्यासाठी बनवायला लागायचं. परत बाबांचे कपडे असतीलजेवण झाल्यानंतरची भांडी असतील ते सगळं गरम पाण्यात टाकून काही वेळाने धुवायला लागायचं. मी बाहेरून आलो की स्वतःला नीट सॅनिटाईझ करून अंघोळ करायला लागायची. बाकी कोणत्याच गोष्टींकडे वेळ द्यायला अजिबात जमत नव्हता. आणि या सगळ्यातच स्वतःचं मानसिक आरोग्यही शांत ठेवायचं होतं.







मला माझं मानसिक आरोग्य शांत ठेवायला मीम्सची खूप मदत झाली. मीम्सबरोबरच माझ्या फेसबुकवरच्या मीमर्स मित्रांनाही मला मानसिक बळ दिलं. त्याचबरोबर माझ्या जवळच्या मित्रांनाही (दोन-तीन जणांनी) मला खूप मदत केली. जास्त जणांना मी सांगितलं नसल्यानं त्यांना कल्पना नव्हती. खरंतर जास्त जणांना न सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे मी ही संपूर्ण परिस्थिती नव्याने पाहत होतो. उमजून घेत होतो. तसं एक पत्रकार म्हणून रोज बातम्या पाहत होतोऐकत होतो पण आज पहिल्यांदाच माझ्यावर ही परिस्थिती गुदरली होती. आणि त्याचा काहीच अंदाज न घेता बाकीच्यांना त्याच्यात ओढणं मनाला पटलं नाही. मला माहितीये प्रत्येकजण संवेदनशील असतो. प्रत्येकालाच मदत करायची इच्छा असते. पण यावेळेस मी माझ्या मनाचा कौल घेतला.




तिकडे माझ्या फेऱ्या चालूच होत्या अगदी बाहेरच्या पावसासारख्याच. बाबांची प्रकृतीही सुधारत होती. दम लागणं कमी झालंतापही बंद झाला. पण विलगीकरणाचा कालावधी अजून संपला नसल्याने बाबा अजून ॲडमिटच होते. मग १७ ऑगस्टला बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच शुभदिनी आम्ही आमच्या बाप्पाचेही बुकिंग केले. विलगीकरण अजून चालूच असल्याने बाबा घरातच वेगळीकडे राहत होते. पण आता मनावरचं ओझं बऱ्यापैकी हलकं झालं होतं. मग प्रसन्न मनाने बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली.




कालच बाबांचं विलगीकरण संपलं. बाप्पा आल्यावर आरतीसाठी बाबा व्हिडिओ कॉलवरून कनेक्ट व्हायचे आणि आज बाबा आमच्यासोबत आरतीला उभे आहेत. खूपच वेगळी सुखावह भावना आहे ही. आणि त्यासाठी आजचा दिवस तर खूपच विशेष आहे.

मला सगळ्यांना सांगायचं आहे की कोरोना हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे. याची लागण कशी होतेयाची लक्षणं नक्की कोणती आहेत याचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपणच काहीवेळा कठोर होऊन घरातही सामाजिक अंतर पाळायला हवं. जे आम्ही एप्रिलपासून पाळत आहोत. वेगवेगळं झोपत आहोतजेवतानाही सामाजिक अंतर ठेवूनच जेवण करत आहोत. ही काळजी घेण्याबरोबरच बाहेर कोणी आवश्यक कारणासाठी जात असतील तर त्यानेही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण जर पॉझिटीव्ह निघालो तर आपल्याबरोबर आपल्या घरच्यांनाही त्रास होणारे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. बाहेर जाताना मास्कचासॅनिटाइझरचा वापर करायला हवा. बाहेरून आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करून वाफ घ्यायला हवी. सर्वात शेवटी हा एक आजार आहे. जो कोणालाहीकधीहीकसाही होऊ शकतो. बाकीच्यांबरोबरच ज्यांना तो झालाय त्यांनीही स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि सगळ्यात आधी आपलं मन कसं खंबीर राहील याचा विचार करायला हवा.  



 

 

 

 

 

 

 

 

 

 


0 comments :

Post a Comment