प्रिय माहीस...
प्रिय माही,
आज भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तुझी निवृत्ती जाहीर केली. तुझ्या पाठोपाठ तुझ्या मित्रानेही निवृत्ती घेतली. हे सगळंच किती अनपेक्षित आहे ना?! तुझ्याशिवाय आता क्रिकेट कसं बघायचं? हाच मुख्य प्रश्न आता मला सतावत आहे. सचिननंतरही हाच प्रश्न मला पडला होता पण तुझं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. जेव्हा क्रिकेटचा क सुद्धा माहित नव्हता तेव्हापासून मी तुला पाहत आलो आहे. तुझा आक्रमक आणि वादळी खेळ पाहून मलाही प्रत्येक बाॅलवर सिक्स मारायची इच्छा व्हायची. तुझ्यासारखेच मोठे केस ठेवून सर्वत्र मिरवावं असंही वाटायचं (जे अजूनही वाटतं).
नंतर द्रविडनंतर तू कॅप्टन झालास. तुझे ते वादळी खेळणं आता संयमित होताना दिसलं. तुझ्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक बहरत गेला (अर्थातच त्यात गांगुलीचेही योगदान आहे). तुझ्यावर त्याने टाकलेला विश्वास तू सार्थ ठरवला. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच तू संघावरही लक्ष ठेवलंस.
तुझी संयमी वृत्ती, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघातल्या प्रत्येक खेळाडूला समजून घेऊन, त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला कायम प्रोत्साहन देणं मला खूप जास्त भावलं. त्याचबरोबर कोणतीही ट्राॅफी जिंकली तरी ती संघातल्या नवीन खेळाडूंकडे देऊन तुझं एका कोपर्यात उभं राहणं मनाला एक उगाचच भावनिक किनार देऊन जायचं. कितीही हायप्रेशर सामना चालू असतानाही तुझं मैदानात असणं बघून एका क्षणात प्रेशर नाहीसं व्हायचं. यष्टीरक्षणाबरोबरच तू भारतीय संघाचंही कायम रक्षण केलंस. चाहत्याचं कौतुकही मान्य केलं, टीकाही सहन केल्या.
तुझ्या आजवरच्या या सगळ्या प्रवासात तू कायमच भारतीय संघाला प्राधान्य दिलं. शेवटपर्यंत मैदानावर राहून संघाचा विजयही साकार केला तर कधी अथक प्रयत्न करून मिळालेली हारही आपल्या खांद्यावर घेतली. तुझे states काय आहेत, तू किती धावा केल्या आहेत, कितीवेळा शतक केलं आहे यासारख्या प्रश्नांना तू तुझ्याच शैलीत संयमित उत्तर दिलंस. तुझ्याच नेतृत्वाखाली जिंकलेले दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, दोन एशिया कप आणि टेस्ट क्रिकेटमधे पहिला क्रमांक याचीच ती साक्ष आहे आणि अर्थातच तू याचा कधी गवगवा केला नाहीस.
आता मागच्याच वर्षी तू तुझ्या शेवटच्या सामन्यात धावबाद झालास. आमच्या आशेचा किरण एका क्षणात लुप्त झाला. तुझं ते धावबाद झाल्यावर, चेहर्यावर क्षणभरच दिसलेलं शल्य खरंच मनाला पोखरून गेलं रे. त्यानंतर तू निवृत्त होणार अशा वावड्याही उठल्या पण तू त्यावर काहीच व्यक्त झाला नाहीस. तुझ्याच शैलीसारखं, तू तुझ्या खेळीतूनच उत्तर देशील अशी भाबडी आशा माझ्यासारखे चाहते वर्षभर बाळगून होते, अगदी कालपर्यंतही. तू परत मैदानावर दिसशील आणि या वावड्यांना मैदानाबाहेर भिरकावून देशील असं मनापासून वाटत होतं. पण तू सर्वांना एक अनपेक्षित धक्काच दिलास. पहिल्या सामन्यात धावबाद झालेला तू, तुझ्या शेवटच्या सामन्यातही धावबाद राहिलास. मला माहितीये तू तुझ्या स्वातंत्र्याचा विचार करून निर्णय घेतलास पण आमचं तुझ्यावर प्रेम करायचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. ते अबाधितच राहिल..अगदी तुझ्या हेलिकॉप्टर शाॅटसारखं!
तुझाच एक चाहता.
मयूर वाघ.
😭❤
ReplyDelete