आत्मशोध ते आत्मबोध
आपल्या आयुष्यात प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो.आपले कसे चांगले होईल यावर लक्ष देतो.संकुचित विचारसरणी असली तरी हा प्रत्येक मानवाचा गुणधर्म आहे.काही वेळा त्यामागे स्वार्थ नसला तरी स्वतःच्या फायद्याचा केलेला दूरगामी विचार असतो.स्वतःचा विचार करताना कधी कधी माणसाला दुसऱ्याचा विचार करायचा विसर पडतो.स्वतःपुरता तो एवढा केंद्रित होतो की तो सगळ्यांना स्वतःच्या विचाराप्रमाणे वागवायला लावतो.त्या माणसावरती प्रेम असते,त्याच्याबद्दल काळजी असते म्हणून बाकीचे पण स्वतःला तो सांगेल तसे वागायला लागतात यामुळे मग स्वतःची ओळख कुठेतरी मागे पडून त्याला दुसऱ्याच्या ओळखीचा शिक्का बसतो.सामाजिक विचार न होता तो मग फक्त सकुंचित विचार राहतो.संकुचित विचार सामाजिक होण्यासाठी आत्मशोधाची गरज भासते.आत्मशोध म्हणजे स्वतःचा घेतलेला शोध.एकदा आत्मशोधातून उत्तर मिळाले की सामाजिक बदल होण्यास वेळ लागत नाही.
आजच्या काळात प्रत्येकाला आत्मशोध घ्यायची गरज आहे कारण सकुंचित विचारसरणीमुळे देशाच्या प्रगतीस खीळ बसत आहे.गरीबी,जातींमधील दुरावा,स्वार्थी राजकारण,भेदभाव असे कित्येक प्रश्न संकुचित विचारसरणीमुळे निर्माण होतात.स्वतःपुरता विचार केला तर समाजाचा विकास सुद्धा स्वतःपुरता सीमित राहतो पण जर त्याचा सामाजिक विचार झाला तर त्यामुळे समाजाचा विकास होण्यास वेळ लागत नाही.आपल्या समाजात भरपूर प्रश्न आहेत,छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठमोठया गोष्टींपर्यंत!आपण त्या प्रश्नांवर बोलायला आपल्या आयुष्यातील भरपूर वेळ घालवतो प्रत्येक दिवशी त्या प्रश्नांवर चर्चा करतो.आपले मत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला त्या प्रश्नांवर कधीच ठोस उपाय सापडत नाही कारण प्रत्येकजण स्वतःचे मत स्पष्ट करण्याच्या मागे लागतो.कधी कधी त्या मताच्या पाठिंब्यासाठी प्रत्येकजण जातीय राजकारणाचा फायदा उठवतो आणि मग समाजाचे प्रश्न कायम अनुत्तरितच राहतात पण जर तो सामाजिक विचार झाला,एकाच्या पलीकडे जाऊन तो जर समाज म्हणून विचार झाला,स्वतःच्या इच्छा,आकांक्षा विसरून दुसऱ्याचा विचार केला गेला तर हे प्रश्न कायमचे सुटून आत्मशोधातून सामाजिक विकास साधला जाईल.
आत्मशोधानंतर झालेली समाजाची ओळख आपल्याला आत्मबोधाकडे नेते.सगळ्यांना आत्मबोध म्हणजे काय असा प्रश्न पडू शकतो.आत्मबोध म्हणजे आपल्या आतील शक्तींची जाणीव होणे आणि त्याहीपलीकडे जाऊन त्या शक्तींचा समाजपयोगी कामासाठी वापर करणे.वैयतिक सुखांना तिलांजली देऊन जो समाजाचा विचार करतो त्याला खरा आत्मबोधाचा साक्षात्कार होतो असे मला वाटते.आत्मबोधाचा साक्षात्कार हा समाजात फिरून समाजाचे प्रश्न जाणून घेऊन आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याने होतो.रोज टपरीवर चहा पिता पिता सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून,निवडणूकांपूर्वी आश्वासनांची खैरात करून,विरोधकांसारखे सदैव फक्त व्यवस्थेला दोष देऊन,समाजात जातीय फुट पाडून कधीच आत्मबोधाचा साक्षात्कार होत नाही.पाण्यासारखे मन निर्मळ असेल तर आत्मबोध होऊ शकतो.
जर आपल्याला स्वतःची ओळख विसरून सामजिक ओळख हवी असेल,समाज म्हणून प्रत्येक गोष्टींचा विचार हवा असेल,सामाजिक प्रश्न एक व्यक्ती म्हणून न सोडवता एक समाज म्हणून सोडवायचे असतील,वैयतिक सुखांना तिलांजली देऊन फक्त समाजाचा विचार करायचा असेल तर मानवी आयुष्यात आत्मबोधाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही.
आत्मशोध ते आत्मबोध असा प्रवास करून मानवी आयुष्याचे सार्थक होते कारण यामधे फक्त एका व्यक्तीचा विचार न होता सामाजिक विचार साधला जातो,'स्व' ची जाणीव होते,मानवी मूल्यांचे महत्व पटते,स्वार्थीपणाचा विसर पडतो,सामाजिक हिताचा विचार होतो आणि यात सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी करून मिळणारा आनंद चिरंतन राहतो.
Masta
ReplyDeleteधन्यवाद मित्रा :)
ReplyDelete