'कौल'

Monday, 7 November 2016

'कौल'


                    
            भिडला तर चित्रपट                  भिनला तर विचित्रपट 


  चित्रपटाच्या सुरुवातीपासून पडद्यावरती असलेली नजर चित्रपट संपल्यावर सुद्धा पडद्यावर टिकून राहते हे "कौल" या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.चित्रपट बघून झाल्यानंतरच्या धक्क्यातून आपण सावरून बाहेर पडतो तरीपण डोके सुन्न करून टाकणारी कथा आयुष्यातील प्रत्येक क्षणी विचार करायला भाग पाडते.


   आपण या चित्रपटाचा सुरुवातीपासून एक भाग होऊन जातो.कोकणातील निसर्ग,पाऊस,धुकं,काळोख,रात्र,दिवस,बैटरीचा उजेड,रेडिओ,भास-आभास,स्वप्नं या गोष्टींमुळे आपण चित्रपटातील एक पात्र होऊन जातो.चित्रपटातील प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातील वाटतो.हा चित्रपट मनाला वेड लावतो.हा चित्रपट बघत असताना आपल्याला कसलेही भान राहत नाही.या चित्रपटाला कथा आहे पण कथानक नाही कथेत आपण एवढे गुंततो की आपल्याला स्वतःचा विसर पडतो स्वतःचे अस्तिव,स्वतःच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध,चमत्कार,तो झाल्यानंतर आलेले चित्र-विचित्र अनुभव,त्याचे लावलेले संबंध या सर्व गोष्टींनी या चित्रपटाची कथा बहरली आहे आणि त्यामुळेच ती आपल्याला भावते. 


  उत्कृष्ट छायाचित्रण चित्रपटाचे महत्व वाढवते हे या चित्रपटाने सिद्ध केले आहे.मलातरी आजतागायत मराठी चित्रपटात असे छायाचित्रण पाहायला मिळाले नाही असे वाटते.चित्रपटातील काही दृश्ये अक्षरशः वेड लावतात 
दिग्दर्शकाने चित्रपटाची प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक लावली आहे.प्रत्येक फ्रेमला अर्थ असून त्या चित्रपटाचा आशय उंचावतात. 


  उत्कृष्ट छायाचित्रणाबरोबरच चित्रपटातील ध्वनी हा चांगलाच भावतो.ध्वनी हा या चित्रपटातील एक महत्वाचा घटक असून त्याचे संयोजन पण दिग्दर्शकाने उत्तम केले आहे.प्रेक्षकाला चित्रपटाशी जोडून ठेवण्याचे काम ध्वनीने केले आहे.चित्रपटात योग्य त्या ठिकाणी ध्वनीचा चपखल वापर दिग्दर्शकाने केला आहे.


  चित्रपट संपल्यावर आपल्या डोक्यातून या चित्रपटाचा विचार जात नाही.आपण स्वतःलाच प्रश्न विचारात बसतो असे फार कमी चित्रपट पाहून झाल्यावर होते.आदिश केळुसकर यांचा हा पहिला प्रयत्न आहे पण त्यांची ही झेप फारच विलक्षण आहे.असे
पहिल्यांदा वेगळ्या आशयाचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे यात तिळमात्र शंका नाही.पहिल्याच चित्रपटात असा प्रयत्न करणे फारच कौतुकास्पद
आहे त्यांच्या ह्या प्रयत्नाने प्रत्येक जण समृद्ध होईल अशी आशा!! 




          हा चित्रपट का बघावा??
मराठी चित्रपटसृष्टी मधे आजतागायत न झालेल्या उच्च दर्जाच्या छायाचित्रणासाठी!! 
वेगळा आशय व वेगळा अनुभव अनुभवण्यासाठी!! 
नवोदित तरुण दिग्दर्शकाच्या कष्टांसाठी!! 
चित्रपट नाही तर एक विचित्रपट म्हणून!! 
स्वतःच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध जाणून घेण्यासाठी!! 


 हा चित्रपट १८ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे तरी आपण सर्वांनी तो जरूर पहावा असे मला वाटते.


चित्रपटाचा टीजर:
https://www.youtube.com/watch?v=DYpKxm3x8sM





















0 comments :

Post a Comment