May 2016

Sunday, 22 May 2016

मैत्री




मैत्री हा शब्द उच्चारला की एखादया व्यक्तीविषयीच्या आठवणी व त्याच्या विषयी असलेला भावानिक 

सलोखा या गोष्टी डोळ्यासमोर येतात.मैत्री ह्या शब्दाशी कित्येक आठवणी निगडीत असतात.मैत्री म्हणजे 

आठवणींचे कोंदण.आठवणी ह्या चांगल्या व वाईट अशा संमिश्र स्वरूपात असतात.आठवणींचा संग्रह मैत्री 

घट्ट करतो.आठवणींबरोबर एक दुसऱ्याच्या मनातील भावना मैत्रीमुळे जोडल्या जातात.




मैत्रीमुळे परस्परांची सुख दुःखे समजण्यास मदत होते.आयुष्यातील अडी अडचणींना एकत्र तोंड देता येते.काही वेळा मनुष्याला त्याच्या आयुष्यात अडचणी येतात,त्या अडचणींना तो तोंड देण्यासाठी एकटा समर्थ नसतो.तेव्हा त्याला कोणाची तरी साथ हवी असते जो त्याच्याबरोबर शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहील,आणि असे निस्वार्थपणे अखंड साथ देणारे नाते म्हणजे 'मैत्री'!


नातेसंबंधांमध्ये असणारी औपचारिकता मैत्रीमध्ये नसते.मैत्रीला कुठल्याही जातीधर्माचे बंधन नसते.मैत्रीमध्ये वय,वेळ,समाज याचे देखील बंधन राहत नाही.मैत्री हि झऱ्याप्रमाणे निखळ स्वच्छंदी असते.मैत्रीचा सहवास आयुष्याला उभारी देतो.

मैत्रीचे अनेक प्रकार आहेत.एखादयाचा वापर करून घेण्यासाठी केलेली मैत्री,रोज रोज भेट होत आहे म्हणून झालेली मैत्री,एखादयाबरोबर भावनिकरीत्या गुंतल्याने नकळत होणारी मैत्री असे अनेक प्रकारातून मैत्रीचे आपल्याला दर्शन होते.नकळत होणारी मैत्री फारच आनंददायी असते कारण त्यात आपण एवढे गुंततो कि आपल्याला वेळ काळाचे भान राहत नाही.दुसऱ्यांच्या मनातील भावनांशी आपला थेट संवाद होतो.त्याचबरोबर आपल्याला मनातील भावनांबरोबर आयुष्यभराच्या आठवणींचा देखील खजिना गवसतो.

मित्र म्हणजे नक्की कोण असा प्रश्न मला नेहमी पडतो पण दुसऱ्याच क्षणाला मला त्याचे उत्तर मिळून जाते.व्यक्तीच्या आयुष्यातील जवळजवळ सर्व भूमिका मित्र निभावतो.आई,वडील,बहिण,पत्नी,मुलगा,मुलगी अशा कित्येक नात्यांमधे आपल्याला मित्र मिळतो.प्रत्येक नात्यांमधे मित्राची भूमिका वेगवेगळी असते पण त्याचे कर्तव्य तो मनापासून निभावतो.
मैत्री झाल्यानंतर मनुष्याला काही जबाबदाऱ्या पण येतात.मित्राचे हित जपून त्याला आयुष्यात काही निर्णय घ्यावे लागतात.मित्र चुकत असेल तर त्याला योग्य दिशा दाखवून योग्य मार्गाला न्यायचे काम खरी मैत्री करते.मित्रांच्या वाटचालीमधील पथ बनून मित्राचा मार्ग सरळ सोप्पा करण्याचे काम खरी मैत्री करते.प्रत्येक कठीण प्रसंगी मित्र खंबीरपणे उभे राहतात.

मैत्री जेव्हा असते,तेव्हा तो सर्वात सुखद काळ असतो.विरहात तिची आपल्याला तीव्रतेने उणीव भासते आणि तिचे महत्व देखील कळते.जी मैत्री कायम टिकते तिच खरी मैत्री होय.मैत्रीमुळे आयुष्यात चैतन्य येते.मैत्रीमुळे मानवी जीवनाचे सार्थक होते.मैत्रीमुळे माणूस हि गोष्ट माझी आहे हे विसरून हि गोष्ट आपली आहे असे बोलतो.
मैत्रीबद्दल कितीही बोललो तरी कमीच आहे.मैत्रीचा खरा अर्थ आपल्याला समजला तर आयुष्य आपल्याला जास्त चांगला जगता येईल आणि त्याचा आनंद पण दीर्घकाळ टिकणारा असेल,कायम अबाधित!