October 2017

Sunday, 15 October 2017

मी घेतलेला शोध


मानवी आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे फार महत्वाचे असते. शोधातून गोष्टींची उत्पत्ती कळण्यास मदत होते. ती गोष्ट नक्की काय आहे, ती काय करते, तिचा कशासाठी उपयोग होतो अशाप्रकारच्या विविध प्रश्नांची उकल शोधातून होते.
मध्यंतरी मी देखील एक शोध घेतला. अभ्यासक्रमात शोधप्रबंधाचा समावेश होता म्हणून कदाचित शोध घेण्यास मी सुरूवात केली. सुरुवातीला फक्त गुणांची अपेक्षा या भावनेतून शोधाकडे पाहिले पण जसा जसा शोध घेत गेलो तसे शोधाकडे बघण्याची नजर बदलली.
'Reading habits among students and its effect on academic performance' असा मी माझ्या शोधासाठी विषय घेतला. हा विषय घेण्यामागचे कारण म्हणजे मी स्वतः शालेय जीवनात भरपूर वाचन केलेले आहे. आणि त्या वाचनाचा शालेय जीवनाबरोबरच आजपर्यंतच्या जीवनात सुद्धा उपयोग होत आहे. असे म्हणतात की वाचन हे कधी वाया जात नाही या उक्तीचा प्रत्यय मला वैयक्तिक आयुष्यात नेहमी येतो.
शालेय जीवनात आपले भरपूर वाचन होते. पण सध्या असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन पण तेवढे प्रभावी आहे का हा माझा शोध घेण्याचा मुख्य उद्देश होता. आणि मग जर ते आजही आहे तर त्याचा शैक्षणिक गुणवत्तेशी संबंध आहे का हे पाहणे मला उपयुक्त वाटले.
मुलांच्या वाचन सवयी ओळखण्यासाठी मी माझ्याच पूर्व प्रशालेची म्हणजेच ज्ञान प्रबोधिनीची निवड केली. पुण्यातील एक अभिनव कल्पनांना स्वरूप देणारी शाळा म्हणून प्रबोधिनी ओळखली जाते. या शाळेतील मुलांच्या वाचन सवयी ओळखणे म्हणजे माझ्यासाठी मोठं कसबच होतं पण घेतला वसा टाकणार नाही या विचाराने मी माझ्या शोधाला सुरूवात केली.
७ वी, ८ वी आणि ९ वी या इयत्तेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रश्नावली तयार केली. त्यात वाचनाशी संबंधित तसेच ग्रंथालय वापराशी निगडित प्रश्न समाविष्ट केले. या बरोबरच त्यांचे आवडते विषय कोणते आणि वाचनाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन असे प्रश्न सुद्धा विचारले. या दोन प्रश्नांमुळे त्यांच्या वाचनाच्या सवयी कळण्यास फार मदत झाली. त्यांची असलेली विषयाची आवड आणि ते करत असलेले वाचन हे मला पडताळून पाहता आले. तसेच मुलांच्या वाचन सवयीत ग्रंथालये देखील कशी भूमिका बजावतात हे मला कळाले. साधारणपणे १२० मुलांना मी प्रश्नावली सोडविण्यासाठी दिली.
मुलांना दिलेल्या प्रश्नावली बरोबरच मी ग्रंथपाल आणि प्राचार्याची छोटी मुलाखत घेतली. त्यातून ग्रंथालय म्हणून मुलांचे वाचन वाढण्यासाठी घेत असलेले प्रयत्न आणि एक शाळा म्हणून मुलांचे वाचन वाढण्यासाठी घेत असलेले प्रयत्न याचा मला शोध घेता आला.
सबंध शोध घेत असताना भरपूर अडचणी आल्या. काही ठिकाणी अपेक्षित उत्तरे मिळाली नाही, प्रश्नावलींचे वर्गीकरण करताना विलंब झाला, मुलांना प्रश्नावली देताना काही प्रश्न आठवले अशाप्रकारच्या अनेक अडचणी आल्या. पण अशा अडचणींवर मात करत शोध प्रबंध पूर्ण केला.अडचणींशिवाय असलेला शोध हा अपूर्ण असतो कारण अडचणींना मात देत शोधाला गती देणे फार महत्वाचे असते आणि मी त्यालाच प्राधान्य दिले.
या तंत्रज्ञानाच्या युगात देखील वाचन हे होते असा माझा शेवटचा दिलासादायक निष्कर्ष होता. फक्त वाचन हे निरंतर असायला हवे असे मला वाटते. वाचन ही कधीच न संपणारी गोष्ट आहे आणि वाचनाचा आयुष्यात कधी ना कधी उपयोग होतोच फक्त गरज आहे ती वाचत राहण्याची!