मनसे : कालची, आजची व उद्याची!
राज ठाकरे यांचा जन्म १४ जून इ.स. १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लहान बंधू होते. राज ठाकरेंचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले.
३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन पुकारले. अनेक मुंबई आणि महाराष्ट्रीयन हिंदी भाषकांना मारहाण करण्यात आली. मुंबई अगोदरच बकाल झालेली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल असे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला.त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यातील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा सवाल करत त्यांनी तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक व प्रांतीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. या भूमिकेला धरूनच पश्चिम रेल्वेच्या परिक्षाही मनसेने उधळून लावल्या व त्याबरोबरच परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना देखील पळवून लावण्यात आले. यामुळे अनेक हिंदी प्रसारमाध्यमांचा रोष मनसेने आपल्या अंगावर ओढवून घेतला. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार या बिहारी नेत्यांनीही राज ठाकरेंवर टीका केली. या सर्व आंदोलनाचे पडसाद मुंबई बरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरले. या नंतर नारायण राणे, छगन भुजबळ, यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टीका केली. शोभा डे या मान्यवर लेखिकेने देखील आय.बी.एन या वाहिनीवर डेव्हिल्स ॲडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले. राज ठाकरे यांच्यावर विविध प्रकारचे ८४ गुन्हे दाखल करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांची देखील अनेक ठिकाणी धरपकड करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारला ढिलाई दाखवल्याची टीका सहन करावी लागली आणि मग याचे रुपांतर राज ठाकरेंच्या अटकेत झाले. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष आणखी वाढला व परिणामी राज्य सरकारला राज ठाकरेंना अटकेतून मुक्त करणे भाग पडले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे तसेच उत्तर प्रांतियांविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे त्यावर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथे मनसेचे १३ आमदार निवडून आले. नंतर ४ आॅगस्ट २०११ रोजी राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला. मोदींच्या रुपाने राजसाहेबांना त्यांचा पहिला राजकीय मित्र मिळाला. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी राजसाहेबांनी त्यांना दिलेला पाठिंबा. मोदींनी सुद्धा या मैत्रीचा आदर ठेवत मनसेने तयार केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लू प्रिंट मधले काही निर्णय अस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरू केले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे २०१२ मधे नाशिकला मनसेचा महापौर झाला तसेच पुण्यात मनसेने विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारली. याबरोबरच तेव्हा मनसेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २७ जागांवर यश मिळाले. पक्षाच्या वाढत्या वाटचालीबरोबरच मनसेने मराठी अस्मितेसह हिंदुत्वाचाही मुद्दा धरला. पण २०१४ रोजी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमधे मनसेला सार्वत्रिक पिछेहाटीचा सामना करावा लागला. यामुळेच कदाचित राजसाहेबांची जनमानसांत असलेली लोकप्रियता कुठेतरी कमी होत आहे का याची जाणीव होण्यास सुरुवात झाली.
याचाच प्रत्यय २०१७ च्या मनपा निवडणुकांच्या निकालांमुळे सर्वांना आला. यामुळे मनसेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. नाशिकमधे सुटलेली सत्ता व मुंबई, पुण्यात झालेली पक्षाची पडझड यावरुन सुरुवातीच्या काळात असलेला 'राज ठाकरे' या नावाचा करिष्मा आता कुठेतरी कमी झालाय का ही चर्चा सर्वत्र सुरू झाली. टोलबंदीचे फसलेले आंदोलन, सेटलमेंट चा शिक्का, निवडणुकीपूर्वी झालेली पक्षांतरे अशा विविध समस्यांमुळे पक्ष लोप पावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
या नव्या वर्षात मराठी जनांच्या मनावर मनसेची लोप पावलेली लोकप्रियता परत आणण्याचे अवघड काम मनसेला पर्यायाने राजसाहेबांना करावे लागणार आहे. याचीच सुरुवात फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनाने झाली असली तरी खरी सुरुवात ही राजसाहेबांनी व्यंगचित्रांच्या मार्फत केलेली आहे. राज ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही अशी तक्रार मनसे सोडून गेलेले नेते करत असतानाच आता व्यंगचित्रांमार्फत राजसाहेब लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मनसेची नवीन उभारणी व विरत चाललेली लोकप्रियता परत आणण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्ममधून थेट लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचता येते यासाठीच त्यांनी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करताना या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पक्षाचे स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने मनसेने आपले पाऊल टाकलेले आहे. जुन्या मुद्द्यांना, विचारांना तसेच पक्षीय धोरणांना बगल न देता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांना दिलेले स्वरूप नक्कीच मनसेची नवीन सुरुवात करण्यास कारणीभूत ठरेल यात तिळमात्र शंका नाही.