ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही बोलून बघा!
डिप्रेशन म्हणजे नक्की काय?
डोकं रिकामं केलं तरी
त्याला उत्तर
देता आलं नाही
रात्र जागवत असतो म्हणे.
चित्रविचित्र रात्र असली
तरी तो जागतो
रिकाम्या नभाकडे
एकटक पाहत असतो..
त्यावेळी त्याला
कसली शुद्ध नसते
अशातच
रात्रीच्या नीरव शांततेत
दूर कुठेतरी
कुत्रीही भुंकत असतात
उगाचच
शांततेला आव्हान.
तो तरी निश्चलपणे
नजर कायम ठेवतो
काय माहित
रिकाम्या नभात
कुणाला शोधत असतो
तेव्हा खोल गेलेले डोळे
डोळ्यांखालची वर्तुळे
उगाचच भयानक वाटतात
डोक्यावरचे
दोन-चारच
पांढरे केस
वेगळे वाटतात
हे असं असतं का डिप्रेशन?
बाह्य रूप बदललं तरी
तो आतून किती पूर्ण आहे?
भयाण रिकाम्या शांततेत
त्याचा मोठा आवाज आहे
गालावर सुकून गेलेल्या
आसवांमध्ये नक्की
कसली भीती
दाटली आहे?
त्याच्या डोळ्याखालच्या
वर्तुळात हरवताना
विचाराने दिशा पकडली
आता डिप्रेशन म्हणजे नक्की काय?
याचं उत्तर मिळालं होतं..
रात्र जागवली याचं दुःख होतंच
पण खोल गेलेल्या डोळ्यांनी
आज डिप्रेशन पाहिलं होतं!
मागच्याच वर्षी ही कविता लिहिली होती. तेव्हा डिप्रेशन म्हणजे नक्की काय असतं याचाच विचार डोक्यात चालू होता. त्या विचारामुळे मला अनेक प्रश्न पडत होते.
डोक्यात चाललेले नकारात्मक विचार, एकटेपणा, सतत मिळणारं अपयश, नाकारल्याची भावना, जवळच्या व्यक्तींकडून होणारं दुर्लक्ष किंवा होणारा त्रास, कोणीतरी कमी लेखत असल्याची भावना यांसारख्या गोष्टींमुळे डिप्रेशन निर्माण होतं का? आणि जर होत असेल तर याचा बाह्य रूपावरही परिणाम होतो का? आणि बाह्य रूप जरी बदललं तरी प्रश्न कायम राहतात का उत्तरे मिळतात? यांसारखे प्रश्न मला सतत पडत होते. डिप्रेशनवर कविता लिहिण्याच्या नादात मीही ती phase अनुभवत होतो.
पण या ड्रिपेशनचा विचार करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, मनुष्य जेव्हा जन्माला येतो. तेव्हा त्याच्या डोक्यात काहीच गोष्टी नसतात. टोटल कोरी पाटी असते. पण जसजसं आयुष्य सुरू होतं. तसं त्याच्याकडे जबाबदार्या येतात. त्यांच्याच जोडीला नवीन नाती येतात.
ती नाती सांभाळत असतानाच मूलभूत गरजांचाही त्याला विचार करायला लागतो. सगळी कसरतच असते ही. या कसरतीत काहीजण लगेच सराईत होतात तर काहींना वेळ लागतो. पण प्रत्येकाला ही कसरत करावीच लागते. पण या कसरतीच्या खेळात स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आपण या कसरतीत एवढं गुंतून जातो की आपल्याला आपला विसर पडतो.
हा विसर मग अनेक प्रश्न निर्माण करतो. त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो. स्वतःच्या पातळीवर किंवा जवळच्या नात्यांची मदत घेऊन, पण एकाबाजूला आपल्याला कसरतीतही जायचं असतं. तिच्यातील स्पर्धा आपल्याला खुणावत असते. त्यासाठी आपण काहीवेळा प्रश्न तसेच ठेवून परत कसरतीत घुसतो. तोपर्यंत त्या प्रश्नांचा ढिग होण्यास सुरवात होते. एकामागून एक प्रश्न असे ते येतच राहतात. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.
एकेदिवशी मग आपल्याला त्याची जाणीव होते. अशावेळी तुम्ही त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करता, जवळच्या नात्यांची मदत घेता, त्यांच्याकडं व्यक्त होता, मनात कसलाही विचार न ठेवता तुम्ही ती उत्तरं मिळवण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागता.
पण याचं दुसरं गंभीर टोक म्हणजे मृत्यू. एवढे प्रश्न समोर आहेत आणि त्यांचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे मृत्यू अशी भावना तेव्हा तयार होते. तुम्हाला कोणताही त्रास नको असतो. प्रश्नांच्या पलीकडचं जग तुम्हाला खुणावत असतं. कसरतीच्या नादी लागून स्वतःमध्ये केलेले बदल तुम्हाला आपले वाटत नाही. एकटेपणा जरी असला तरी तो आपला वाटतो.तुमची ही भावना दुसऱ्यांसाठी जरी नकारात्मक असली तरी तुमच्यासाठी तेव्हा ती सकारात्मक होऊन जाते. अंतिम निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही त्याला अधीन होता. आणि मग उरते फक्त स्मशानशांतता!
आता आपल्याला ठरवायचं आहे. कारण कसरत तर सर्वांनाच करायची आहे. तिला सोडून चालणार नाहीये. आपणच जर पहिल्यापासूनच प्रश्न सोडवत गेलो तर वरची परिस्थिती निर्माणच होणार नाही. आता हे प्रश्न नक्की कोणते आहेत याचा प्रत्येकाने आपापला विचार करून ठरवायचे आहेत. एकदा का प्रश्न शोधले की परत त्यांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ नाही लागणार.
तुम्हाला हे जर अवघड जात असेल तर यासाठी बिनधास्त दुसर्यांकडे मदत मागा, माझ्याकडे मागा. मनात कसलीही आडकाठी न ठेवता, आपल्याला कोणीतरी जज करेल ही भावना न आणता मोकळेपणानं व्यक्त व्हा कारण ते गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांनाही पडलेले असतील, त्यांचे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. यात प्रश्न शोधणं महत्त्वाचं आहे.
आणि त्याबरोबरच हेही लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच असतात. कदाचित तेच त्या प्रश्नांचं उत्तर असतं. सो उत्तरं मिळवण्याच्या मागे न लागता प्रश्न शोधायला शिका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे आयुष्य कठीणच आहे. आपल्याला सर्वांची साथ घेऊन, वेळेप्रसंगी दुसर्यांना साथ देऊन ते फक्त जगायचं आहे. आपल्या हक्काचं बनवायचं आहे. जगण्यात मजा आहे बाॅस, अडचणी नसतील तर ते आयुष्य कसले. आणि ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही एकदा बोलून बघा!