बदल

Tuesday, 28 March 2017

बदल


गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशीच मी हा ब्लॉग सुरु केला होता.वर्षांतील दिवसांप्रमाणेच मी सुध्दा माझ्यात काही बदल केले.लवकर येणारा राग आजकाल क्वचितच येतो,समोरच्याला समजून घेणे वाढले असे कित्येक बदल स्वतःमधे केले.स्वतःचे बदल स्वतः सांगण्यापेक्षा लोकांच्या लक्षात जर ते बदल आले तर मनाला जास्त आनंद मिळतो.हे परिवर्तन कसे होते,त्यासाठी काय करावे लागते हे मी यावेळेस अनुभवले.तोच अनुभव आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे.

मनुष्याच्या आयुष्यात बदल हा गरजेचा असतो.व्यक्तिमत्व विकसन हे परिवर्तनामुळे होते.काल मी जो होतो,आज मी काही वेगळा आहे यात बदल हा महत्त्वाचा घटक ठरतो.कुठलाही बदल हा सहज घडत नाही.प्रत्येक बदलाला काहीतरी स्रोत असतो.कोणाच्या तरी सांगण्यावरून,कोणाकडून तरी प्रेरित होऊन बदल होतो.




स्वतःचा घेतलेला शोध म्हणजेच आत्मशोध ही बदल करण्यापूर्वीची पहिली पायरी असते असे मला वाटते.आपण काय करतो,आपण कसे वागतो,आपण कसा विचार करतो,आपण केलेला विचार कसा कृतीत आणतो हे सर्व आत्मशोधात येते.भूतकाळात झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या वर्तमानकाळात त्याचबरोबर भविष्यकाळात देखील होणार नाहीत ना याची काळजी आत्मशोधात घ्यावी लागते. 

आत्मशोधानंतर येते ती परिवर्तनाची तयारी.परिवर्तन करण्यापूर्वी आपण परिवर्तन करायला तयार आहोत की नाही याचा विचार आत्मशोधानंतर करावा लागतो.जवळच्या माणसांना आपला बदल आवडेल की नाही याचा विचार परिवर्तनापूर्वीच्या तयारीत करावा लागतो. 

यात सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे 'बदल'.आपल्या आयुष्यात आपण भरपूर चुका करतो.चुका कळाल्यावर माफी देखील मागतो.काही वेळा चुकांची पुनरावृत्ती देखील होते.तरीसुध्दा जवळची माणसं आपल्याला माफ करतात.पण आपण कधी याचा विचार करतो?आयुष्यात कितीवेळा आपल्या चुकांसाठी ती माणसं आपल्याला माफ करणार?शेवटी ती पण माणसंच असतात.या सगळ्या गोष्टींसाठी बदल हा आवश्यक असतो.

व्यक्तिगत बदल हा समाज घडवायला मदत करतो असे मला वाटते.काल झालेली चूक आज पुन्हा झाली नाही हे बदल घडण्याचे उत्तम उदाहरण आहे.झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप व्यक्त करण्यापेक्षा स्वतःमधे केलेला बदल हाच मनुष्याला सर्वाधिक आनंद देतो.परस्परांमधील असलेली नाती टिकवण्याचे काम बदल करतो.स्वतःचे केलेले सिंहावलोकन आणि त्यानंतर स्वतःमधे केलेला आमूलाग्र बदल याचा आनंद मनुष्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून राहतो.   

2 comments :