August 2018

Sunday, 26 August 2018

पोहे आणि मी!









पुण्यात राहून जर पोहे आवडत नसतील तर पुणेकर असल्याचा खोटा अभिमान कोणीही बाळगू नये असे माझे प्रेमळ मत आहे. पुणेकरांच्या आयुष्यात दिवसाची सुरुवात चहाने झाल्यावर नंतर पोहेच असतात. पुणेकर असल्यामुळे हीच सवय मलाही आहे. शालेय जीवनापासून मी पोहे खायला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच पुणेकर आणि पोहयांचे नाते किती घट्ट आहे याची जाणीव मला झाली.

मी आठवीत असताना 'प्रबोधिनी'जवळच असलेल्या 'उभे' या ठिकाणी पोहे खायचो. गरमागरम चविष्ट सांबर, वर असलेली पिवळी, लाल शेव आणि द्रोणातील चवदार पोहे या गोष्टींमुळे माझा पोहयांकडे ओढा वाढला. दररोज एकदातरी उभेचे पोहे व्हायचे. काही वेळा घरून डबा मिळायचा नाही मग तेव्हा मधल्या सुट्टीत उभेचे पोहे असायचे. साधारण दहावी पर्यंत मी फक्त तिकडचेच पोहे खायचो.

अकरावी-बारावीला जास्त पोहे खायची वेळ आली नाही. ठिकाण बदलल्यामुळे आणि एखाद्याच गोष्टीची आवड निर्माण झाल्यामुळे दुसरीकडे पोहयांची चव ट्राय करायचे धारिष्ट्य केले नाही. पण नंतर फर्ग्युसनला आल्यामुळे नवीन चवी ट्राय करणं मस्ट झालं. म्हणूनच चहाच्या टपरीवर चहाबरोबरच पोहे देखील सुरू झाले. यातच एक पोहयाचे नवीन काहीसे व्हर्जन म्हणता येईल असं खाण्यात आले. आम्ही त्यावेळीस सिंहगड रोडला मित्राच्या घरी रात्री अभ्यास करायला जमायचो. अभ्यासाला जरी जमत असलो तरी खरं कारण वेगळंच असायचे. पहाटे तीन वाजता पोहे खायला आम्ही कमिन्स काॅलेजजवळ जायचो. गरमागरम मटकी सॅम्पल आणि वरती लिंबू पिळलेले पोहे हे पहाटे पहाटे खूप खास लागायचे. आमचे क्वचितच घरी लवकर गेल्यामुळे ते पोहे चुकलेले आहेत पण मुद्दामून त्यांच्यासाठीच रात्र जागवल्याचेही मला आठवत आहे.

कमिन्स बरोबरच कधी लवकर पोहे खावेसे वाटले म्हणजेच १२-१२.३० ला तर कोथरूडला देसाई बंधू आंबेवाल्यांच्या इथे पोहे खायला जायचो. तिकडच्या पोह्यांची चव ओके ओके आहे. कमिन्सच्या आधी अमृतेश्वराला पहाटे पोहे खायला जायचो कारण तेव्हा आम्हाला कमिन्सचा स्पाॅट माहित नव्हता आणि नंतर पुढे पुढे अमृतेश्वराच्या पोहयांची सुद्धा टेस्ट बिघडली. कॉलेजच्या खासकरून शेवटच्या वर्षात भरपूर वेळा कमिन्सवर स्वारी असायची पण नंतर एकदा काॅलेज संपलं आणि ती जागा सुटली.
सध्यातरी आयुष्यात पोहे फक्त घरी खाऊन होतात. मी प्रबोधिनीचाच असल्यामुळे उभेला फक्त प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनीच भेट होते. पण कधी चुकून गेलो तरी आठवीतले आणि आठवणीतले दिवस आठवतात आणि तेव्हाचीच चव जिभेवर रेंगाळते.


ता. क. मला उत्तमप्रकारे पोहे करता येतात आणि मी ते करतोही पण एकदा घरी एकटा असताना अंदाज न आल्यामुळे 'य' प्रमाणात पोहे केले आणि मग त्या दिवशी दिवसभर मी फक्त पोहेच खात होतो. त्यामुळेच मी पोहे करायचे टाळतो! मला आवडणारे पोहे कुठे कुठे मिळतात या जागांची यादी पुढे देऊन ठेवतोय, तिकडचे पोहे कसे वाटले ते जरूर मला कळवा. मी वाट पाहतोय!


इकडचे पोहे मला आवडतात!

  • उभे स्पोर्ट्स, ज्ञान प्रबोधिनी जवळ, राधिका भेळ च्या शेजारी.
  • कमिन्स काॅलेजजवळ (योग्य पत्ता लवकरच अपडेट करतो)
  • देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रोड, कोथरुड. (वेळ बघून जावे, दिवसाढवळ्या फिरकू नये)
  • वैष्णवी स्नॅक्स सेंटर, एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारी, जंगली महाराज रोड.






Saturday, 18 August 2018

चहा आणि मी!


                  
माझ्या जीवनात चहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळची सुरुवात चहाने झाली की माझे दिवसभरात 3-4 चहा होतात. दिवसभर बाहेर असल्यामुळे सकाळचा आणि कधीतरी संध्याकाळचा चहा घरी होतो. चहाचे हे 'गोडव्यसन काॅलेज लाईफ सुरू झाल्यावर लागले आणि यात माझ्या मित्रमंडळीचा फार मोठा वाटा आहे. रोजच्या घडणाऱ्या विविध विषयांवरच्या चर्चाकमाल लेव्हलचे गाॅसिपिंग आणि त्याच्या जोडीला फक्कड चहा यातच माझे काॅलेज जीवन सामावलेले आहे.

मी अकरावी-बारावीला आबासाहेब गरवारेला आर्टस् करत होतो. रेस्ट इअर असल्यामुळे काॅलेजला जाणे फारसे व्हायचे नाही. पण कधीतरी चुकून गेलो तरी गरवारेच्या बाहेर असलेला चहा हमखास व्हायचा. नंतर पुढील शिक्षणासाठी मी फर्ग्युसन घेतले. तिथेच खरे अस्मादिकांना चहाचे व्यसन लागले. मीडियाचे विद्यार्थी असल्यामुळे 'प्रमाणात चर्चा व्हायच्या आणि त्याला ठिकाण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन! तिकडचा चहा फिका वाटत असला तरी चहाची ती चव मला आवडते. आणि मग नंतर फर्ग्युसनच्या चौथ्या गेटपाशी असलेल्या चहाच्या टपरीवर रोजचा चहा व्हायचा. ते ठिकाण निवडण्यामागचे कारण म्हणजे माझ्या डिपार्टमेंटची बिल्डींग त्याच्या जवळ होती आणि खरे कारण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन फार लांब होते आणि त्याला चालत जायचा मी कंटाळा करायचो.

असं चहाचे ठिकाण निश्चित झाल्यावर कधीतरी सकाळीदुपारी लेक्चर झाल्यावर आणि मग संध्याकाळी कॉलेज झाल्यावर चहाचे प्रोग्राम व्हायचे. फर्ग्युसन मधले माझे जवळपास निम्मे आयुष्य मी त्या चहाच्या टपरीवरच व्यतीत केले. एकूणतः फर्ग्युसन मुळे माझे चहाप्रती असलेले प्रेम अधिक वाढले.

आता फर्ग्युसनमधून मी रानडे मधे पुढील शिक्षणासाठी आलोय आणि त्याचबरोबर आलंय माझे चहाबद्दलचे प्रेम! इथे सध्याच आल्यामुळे इकडे असलेल्या चहाच्या वेगवेगळ्या टपऱ्या मी फक्त ट्राय करतोय. पण अजूनही माझ्या जिभेवर फर्ग्युसनच्या बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर असलेल्या चहाचीच चव रेंगाळत आहे.

ता.क. मला उत्तम प्रकारे चहा करता येतो पण मी तो करायचा कंटाळा करतो याची वाचकांनी नोंद घ्यावी! तसेच मला आवडणार्‍या चहाच्या जागांची यादी मी पुढे दिलेली असून तिकडचा चहा तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला कळवामी वाट पाहतोय!


इकडचा चहा मला आवडतो!

  • फर्ग्युसनमधले अण्णाचे कॅन्टीन.
  • फर्ग्युसनच्या चौथ्या गेट बाहेरील चहाची टपरी.
  • येवले चहाहत्ती गणपती समोर.
  • जय भोलेनाथ टी हाऊसपत्र्या मारूती चौक.