घालमेल
खरंतर खूप दिवसांपासून काय लिहू असा प्रश्न पडला होता. एकतर मला उगाच काहीतरी लिहायचं आहे म्हणून काहीही लिहायला आवडत नाही. जोपर्यंत आतून असं काही दाटून येत नाही. माझे दुःख, माझे सुख मनाची परिसीमा गाठत नाही तोपर्यंत माझी लेखणी थंड असते. हे वागणं थोडं अतिशयोक्तीचं वाटलं तरी हेच सत्य आहे. असो. माझ्या या ब्लॉगला गुढीपाडव्याच्या दिवशी पाच वर्षं पूर्ण झाली. २०१६च्या सुरवातीला म्हणजे ८ एप्रिलला ब्लॉग सुरू केला.
तेव्हा स्वतःच्या आयुष्याचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून चला ब्लॉग लिहूयात असा अजिबातच विचार केला नव्हता. खूपजण लिहितात म्हणून आपणही लिहूयात, वाहत्या गंगेत आपलेही हात धुवून घेऊयात असे तेव्हा काही हेतू नव्हते. मी लिहलेल्या सर्व लेखांचं, एकाच ठिकाणी, छानसं काहीतरी डॉक्युमेंटेशन होईल, केवळ हाच प्रांजळ विचार मनाशी बांधून ब्लॉगला सुरवात केली.
पण नंतर जसे दिवस जायला लागले तसे लेखांमध्ये स्वतःचे चित्र उमटायला लागले. मी स्वतःला या माध्यमातून जास्त व्यक्त करायला लागलो. मी लिहीत असलेल्या लेखांमधूनच माझा (मी मानत असलेला) स्वार्थीपणा माझ्या नकळतच लेखांमध्ये डोकवायला लागला. मग तो 'बदल, आत्मशोध ते आत्मबोध, वाढदिवस' यांसारख्या लेखांमधून आपल्याला जाणवलं असेल. नंतर मला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांवरही मी लेखमाला सुरू केली. त्यातूनही आपल्याला जाणवलंच असेल. स्वतःची अशी मानसिक, सामाजिक, बौद्धिक वाढ या ब्लॉगच्या निमित्ताने व्हायला लागली.
पण मग मधे म्हणजे यंदाच्याच वर्षी जानेवारीमध्ये असं वाटायला लागलं की ही वाढ चांगली का वाईट? यातून फक्त माझा स्वार्थ साधला जातोय का? सामाजिक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे लिखाण होतंय का? प्रत्येक जण स्वतःची अशी, स्वतःच्याच आयुष्यात लढाई लढतोय मग आपली लढाई किंवा आपलं दुखणं आपण सकल जनांना का सांगतोय? आपल्या आयुष्यात असं काय दडलंय की त्याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवीये? आपण आपल्या गोष्टी दुसऱ्यांवर लादतोय का? आपलं आयुष्य किती भारीये किंवा आपण आयुष्यात असे काय तीर मारलेत म्हणून कुठंतरी नोंदवून ठेवण्याची खरंच गरज आहे का? असे अनेक प्रश्न मनाला इंगळ्या डसल्यासारखं अहोरात्र डसत होते. तेव्हा खरंच सांगायचं झालं तर त्यांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही. वेळ जाऊ दिला. लिखाण थांबवलं. इन्स्टावरच्या 'मयुरस्पीकस्' नावाच्या पेजवरही शांत राहिलो.
पण आजकाल या क्वारंटिनमध्ये एखादं जुनं दुखणं परत कसं नंतर वर तोंड काढतं अगदी तसंच या भूतकाळामध्ये पडलेल्या प्रश्नांनी मला सतावलं आहे. कोणाची एक्स गर्लफ्रेंडही एवढं सतावत नाही. रिकाम्या डोक्यात खरंच खूप विचित्र विचार येतात. आणि आत्ताच या प्रश्नांची जाणीव होण्याचं मुख्य कारण म्हणजे या महिन्यातच ब्लॉग सुरू करून, पूर्ण झालेली सहा वर्षें. या सहा वर्षात मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत. लिखाणातून मला प्राप्त होणारा आनंद, म्हणजेच माझा सेल्फ हॅपिनेस हा दुसऱ्यांसाठीही आनंदच असतो का? असा प्रत्येक लेखकाला प्रश्न पडायला हवा. खरंच कोणी केलाय का असा विचार? का आपण एक लेखक म्हणून, एक ब्लॉगर म्हणून, एक कवी म्हणून आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वेळ वाया घालवतोय?
माझ्या परिप्रेक्ष्यात बोलायचे झाले तर मी एवढा मोठा किंवा महान नाहीये की माझे लेख सर्वांनी वाचावेत. सर्वांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल असेही काही त्यात नाहीये. मी आतापर्यंत ब्लॉगवरचा प्रत्येक लेख समाजमाध्यमांवर शेअर करत आलोय. तेव्हा माझ्या मनात नक्की कोणता विचार होता? अगदी आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा लेख लिहायलाही मला ब्लॉगचाच आधार घ्यायला लागतोय आणि हीच खरी शोकांतिका आहे. मला तुमच्याकडून याची उत्तरं हवी आहेत. आणि कदाचित त्या उत्तरांवरच या ब्लॉगचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे कृपया लवकरात लवकर मला सांगा. जरी कशाची उत्तरं दिली नाही तरी तुम्हाला आत्तापर्यंत या ब्लॉगनं काय शिकवलं आहे ते सांगितलं तरी मला कळू शकेल.
ता. क. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमची उत्तरं कितीही रोखठोक आणि पाषाणहृदयी वाटत असली तरी मला चालू शकतील. फक्त ज्यांनी आजपावेतो ब्लॉगवरचं काही वाचलं नसेल तर ते सगळं वाचून झाल्यावरच आपलं मत व्यक्त करा. इथे प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त त्याचा स्वैराचार किंवा दुरूपयोग नकोय. बाकी आपण सुज्ञ आहात!
Tu mandlele vichar baryachvela lokanchya manat asatat pan tyana te lihayala jamat nahit Karan te tuzyasarkhe lekhak Nahi pan Tu lihlele vichar vachtana nakalat manatun Chan vatate aani he aapalech vichar aahet ase vatate tevha anek lokanchya bhavnana vat Karun denyasathi lihit Raha.
ReplyDeleteThank you so much...aapla naav?
DeleteTuze writings skills bhari ahet
ReplyDeleteYes..thank you..aapla naav?
Deleteमयूर जसजसा अनुभवांनी परिपूर्ण होत जशी तसतसा तुझा तुला आत्मसाक्षात्कार होत जाईल.तोवर लेखणी जे लिहून घेतेय ते लिहीत राहा.इतर कुणासाठी नाही स्वतःला मोकळं करण्यासाठी लिहिलं जात बऱ्याचदा.तिथे कुणी कौतुक करावे किंवा प्रसिद्धी मिळावी या गोष्टी खूप गौण असतात .त्या गोष्टीचा अजिबात विचार न करता फक्त तुला वाटत ते लिहीत रहा.बस!!!
ReplyDeleteब्लॉगचा उपयोग केवळ आपण व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर आपल्या आवडीनिवडी बद्दल माहिती करून देण्यासाठी(पोहे आणि मी/मिसळ आणि मी ), एखाद्या आवडत्या ठिकाणाची(असे पाहुणे येती) किंवा खाद्यपदार्थाची इतरांना शिफारस करण्यासाठी किंवा आठवणी शब्दरूपात साठवण्यासाठी करत असतो. खरं तर लिहिणं हे एक प्रकारे व्यक्त होणं असतं. रोजच्या आयुष्यात आपण अशा काही घडामोडींना, घटनांना, प्रसंगांना सामोरे जात असतो की ज्याबद्दल व्यक्त व्हावं, अशी इच्छा उफाळून वर येत असते. त्यातूनच अनेक जण समाजमाध्यमांवरून व्यक्त होतात. जसे तू ब्लॉग लिहून व्यक्त होत आहेस .मला तुझ्या लिखाणातून तुझी विचार करण्याची पद्धत , विचार समजले .(बदल /आत्मशोध ते आत्मबोध /Okay ) या लेखातून खूप काही गोष्टी समजल्या,शिकायला मिळाल्या .बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली .कधीकधी आपण जे लिहित असतो त्यातून समोरच्या व्यक्तीला आत्मबोध होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. तुझ्या ब्लॉगमुळे लिखाणामुळे त्या विचारांचा फायदाच होतो ......त्यामुळे ब्लॉग लिहणे थांबवू नकोस .त्यात अजून नाविन्यता घेऊन ये. अजून निरनिराळ्या वस्तूंवर, विचारांवर, गोष्टींवर, घडामोडींवर, प्रसंगांवर, घटनांवर ब्लॉगचे लिखाण कर त्याचा फायदा वाचक म्हणून नक्कीच आम्हाला होईल .आणि तुलाही नक्कीच आनंद मिळेल तुझ्या लिखाणामुळे कोणालातरी वाट मिळते..........
ReplyDelete