वाढदिवस..
कधी कधी मला प्रश्न पडतो कि वाढदिवस आपण का साजरा करतो?सगळ्यांना जेवायला बोलवतो,केक कापतो,भेटवस्तू मिळतात या सर्व गोष्टी यावेळीस घडतात पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर या दिवशी वाढणाऱ्या वयासाठी आनंद व्यक्त करायचा कि आयुष्यातील कमी होणाऱ्या दिवसांसाठी दुःख व्यक्त करायचे हा प्रश्न मला पडतो.
आपण मुख्यतः आनंद म्हणून वाढदिवसाकडे बघतो.वर्षभरातून एकदाच येतो.आपल्या मनासारख्या गोष्टी या दिवशी होतात म्हणून कदाचित आपल्याला या दिवसाचे अप्रूप वाटते.लहानपणी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा वाढदिवस,आपण मोठे झाल्यावर त्याचे साजरा करण्याचे प्रमाण कमी होते.वयानुसार जशी अक्कल येते तसे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण बदलते.
आजकाल मला वाढदिवस साजरा करण्याच्या काही पद्धती खटकतात.लहानपणी केकचा प्रत्येक टुकडा खाणारे आपण आजकाल सरळ तोंडाला केक फासतो हे अक्कल खूपच जास्त आल्याचे प्रमाण वाटते.
केक फासायचाच असेल तर तो थोड्या प्रमाणात फासला तर काही हरकत नाही पण लोक सरळ आख्खा केक तोंडाला फासतात,त्यात त्या बिचाऱ्या केकचा काय दोष? एकूणतः मला हि पद्धत चुकिची वाटते कारण माझ्या बाबतीत केक फासण्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे.
हाच तो २०१४ मधे घडलेला दुर्देवी प्रसंग 😉 |
काही वेळा केकपेक्षा या दिवशी केलेल्या चांगल्या कृती,संकल्प आपल्याला कायम लक्षात राहतात.केक खाऊन आलेल्या क्षणभंगुर गोडव्यापेक्षा या दिवशी केलेली कुठलीही चांगली कृती माणसाला आयुष्यभर टिकून राहणारा गोडवा देते.
वाढदिवस हा स्वतःशी संवाद साधायला असतो असे मला वाटते.वर्षभरात मी किती माणसे जोडली,त्यांच्याशी
किती बोललो,कोणकोणत्या चांगल्या कृती मी वर्षभरात केल्या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे या दिवशी स्वतःला विचारायला हवीत.या दिवशी मिळणारी प्रत्येक उत्तरे आपल्याला आयुष्यात फार उपयोगी ठरतात.स्वतःचे केलेले सिंहावलोकन हे आपल्या भविष्यासाठी फायदेशीर असते.स्वतःच्या वर्षभरात झालेल्या चुका त्या भविष्यात परत होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.
आयुष्यातील दुसरा वाढदिवस |