मिसळ आणि मी!
मिसळबद्दल काय बोलायचे? पुण्याचे असाल तर मिसळबद्दल आपसूकच प्रेम निर्माण होते. पुण्यात राहून जर चांगली मिसळ खायची असेल तर ती नक्की कुठे मिळते हे माहित असायला हवे आणि हे जर माहित करून घ्यायचे असेल तर 'य' प्रमाणात पुण्यातील सर्व मिसळींचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हवा!
मी देखील चांगल्या मिसळीचा शोध घेताना अनेक मिसळींचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्यात ज्या मिसळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळून राहिलेली आहे ती म्हणजे 'रामनाथची मिसळ'.
मी पुण्याचा असलो तरी सुरूवातीला मला रामनाथ मिसळ माहित नव्हती. शाळेत असताना फक्त पोहयांबद्दलच प्रेम होते त्यामुळे बाहेर कधी मिसळ खायचा प्रश्न आला नाही. घरीच मिसळ खाऊन व्हायची. सुरुवातीला तिखट खात नसल्यामुळे अळणी मिसळच आवडायची. फक्त फरसाण 'य' प्रमाणात खायला मिळते म्हणून मी मिसळ खायचो. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा खरे मला मिसळीचे महत्व कळले. काॅलेजमुळे बाहेर जास्त वेळ असायचो. आणि वडापाव तरी किती वेळा खायचे मग वेगवेगळ्या ठिकाणी मिसळी ट्राय करायला लागलो. काॅलेजच्या कॅन्टीन पासून त्याची सुरुवात केली. या सगळ्या ट्राय प्रकरणामुळे मिसळींच्या किती अनेक प्रकारच्या टेस्ट असू शकतात याचा प्रत्यय आला. तिखट, खारट आणि गोड यांच्या पलीकडे पण काही चवी असू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. पुण्यातील वेगवेगळ्या भागांनुसार त्या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळीची चव ठरते असा कयास मी बांधला. असंच मग सर्व ठिकाणच्या मिसळी ट्राय करताना माझा संबंध रामनाथशी आला. याला दुसरे कारण म्हणजे माझ्या मित्रांनी पुण्याची खाद्यसंस्कृती हा विषय घेऊन रामनाथ मिसळीवर बनवलेला व्हिडिओ. तो व्हिडिओ पाहून रामनाथला जायचा मोह आवरला नाही. आणि मग एके दिवशी तो सुदिन उगवला जेव्हा मी रामनाथची मिसळ पहिल्यांदा खाल्ली आणि ती चव मला मनापासून आवडली. मी जरी तो व्हिडिओ पाहिला नसता तरी मला रामनाथची मिसळ आवडली असती यात तिळमात्र शंका नाही.
रामनाथची मिसळ आवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे टिकून असलेले जुनेपण. तीच जुनी चव अजूनही अस्तित्वात आहे यातच रामनाथचे मोठेपण दिसून येते. तर्री, शेव, कांदा, आणि जोडीला लिंबू अशा साध्यासोप्या मिसळीच्या मांडणीमुळे ती मिसळ खावीशी वाटते. नव्या पिढीचा विचार करून जर त्यांनी मिसळीत बदल केले असते तर खऱ्या पुणेकराला कदाचित ती मिसळ आवडली नसती पण तरीही त्यांनी तीच चव आणि मिसळ कायम ठेवली म्हणून सगळ्या नव्यापणात सुद्धा त्यांचे जुनेपण अस्सल टिकून आहे. मग जरी आत्ता चुलीवरच्या मिसळीचे फॅड आले तरी ज्याला खरंच मिसळीचा 'गंध' आहे तो जुन्याकडेच जाईल याची मला खात्री आहे.
ता.क. घरगुती, चुलीवरची, तुपातली, झणझणीत, गरमागरम, खरपूस, ठसकेबाज, चवदार, तर्रीबाज, झन्नाटेदार (रामबंधूची कृपा) इत्यादी प्रकारच्या मिसळी खायला कृपया आम्हाला बोलवू नये! जाहीर अपमान करण्यात येईल. आमच्या हदयात रामनाथचे अढळ स्थान आहे. आम्हाला तिकडचीच मिसळ मनापासून आवडते.
रामनाथच्या आधी वेगवेगळ्या मिसळी ट्राय केल्यामुळे त्यातल्या काही निवडक मिसळींची यादी पुढे देतोय! ती कृपया पाहून घ्यावी पण पुण्यात राहात असताना कायम लक्षात ठेवावे की मिसळ खायची असेल तर रामनाथ शिवाय पर्याय नाही!
इकडची मिसळ बरी आहे!
श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग.
काटाकिरर मिसळ, कमिन्स कॉलेज रोड.
मस्ती मिसळ, कर्वे रोड, कोथरुड.
माझ्या मित्रांनी तयार केलेला व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/idrOkcMQaK8
आणि हो पावापेक्षा ब्रेड बरा!!!!
Kadak!!!
ReplyDelete