Sunday, 15 October 2017

मी घेतलेला शोध


मानवी आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे फार महत्वाचे असते. शोधातून गोष्टींची उत्पत्ती कळण्यास मदत होते. ती गोष्ट नक्की काय आहे, ती काय करते, तिचा कशासाठी उपयोग होतो अशाप्रकारच्या विविध प्रश्नांची उकल शोधातून होते.
मध्यंतरी मी देखील एक शोध घेतला. अभ्यासक्रमात शोधप्रबंधाचा समावेश होता म्हणून कदाचित शोध घेण्यास मी सुरूवात केली. सुरुवातीला फक्त गुणांची अपेक्षा या भावनेतून शोधाकडे पाहिले पण जसा जसा शोध घेत गेलो तसे शोधाकडे बघण्याची नजर बदलली.
'Reading habits among students and its effect on academic performance' असा मी माझ्या शोधासाठी विषय घेतला. हा विषय घेण्यामागचे कारण म्हणजे मी स्वतः शालेय जीवनात भरपूर वाचन केलेले आहे. आणि त्या वाचनाचा शालेय जीवनाबरोबरच आजपर्यंतच्या जीवनात सुद्धा उपयोग होत आहे. असे म्हणतात की वाचन हे कधी वाया जात नाही या उक्तीचा प्रत्यय मला वैयक्तिक आयुष्यात नेहमी येतो.
शालेय जीवनात आपले भरपूर वाचन होते. पण सध्या असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन पण तेवढे प्रभावी आहे का हा माझा शोध घेण्याचा मुख्य उद्देश होता. आणि मग जर ते आजही आहे तर त्याचा शैक्षणिक गुणवत्तेशी संबंध आहे का हे पाहणे मला उपयुक्त वाटले.
मुलांच्या वाचन सवयी ओळखण्यासाठी मी माझ्याच पूर्व प्रशालेची म्हणजेच ज्ञान प्रबोधिनीची निवड केली. पुण्यातील एक अभिनव कल्पनांना स्वरूप देणारी शाळा म्हणून प्रबोधिनी ओळखली जाते. या शाळेतील मुलांच्या वाचन सवयी ओळखणे म्हणजे माझ्यासाठी मोठं कसबच होतं पण घेतला वसा टाकणार नाही या विचाराने मी माझ्या शोधाला सुरूवात केली.
७ वी, ८ वी आणि ९ वी या इयत्तेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रश्नावली तयार केली. त्यात वाचनाशी संबंधित तसेच ग्रंथालय वापराशी निगडित प्रश्न समाविष्ट केले. या बरोबरच त्यांचे आवडते विषय कोणते आणि वाचनाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन असे प्रश्न सुद्धा विचारले. या दोन प्रश्नांमुळे त्यांच्या वाचनाच्या सवयी कळण्यास फार मदत झाली. त्यांची असलेली विषयाची आवड आणि ते करत असलेले वाचन हे मला पडताळून पाहता आले. तसेच मुलांच्या वाचन सवयीत ग्रंथालये देखील कशी भूमिका बजावतात हे मला कळाले. साधारणपणे १२० मुलांना मी प्रश्नावली सोडविण्यासाठी दिली.
मुलांना दिलेल्या प्रश्नावली बरोबरच मी ग्रंथपाल आणि प्राचार्याची छोटी मुलाखत घेतली. त्यातून ग्रंथालय म्हणून मुलांचे वाचन वाढण्यासाठी घेत असलेले प्रयत्न आणि एक शाळा म्हणून मुलांचे वाचन वाढण्यासाठी घेत असलेले प्रयत्न याचा मला शोध घेता आला.
सबंध शोध घेत असताना भरपूर अडचणी आल्या. काही ठिकाणी अपेक्षित उत्तरे मिळाली नाही, प्रश्नावलींचे वर्गीकरण करताना विलंब झाला, मुलांना प्रश्नावली देताना काही प्रश्न आठवले अशाप्रकारच्या अनेक अडचणी आल्या. पण अशा अडचणींवर मात करत शोध प्रबंध पूर्ण केला.अडचणींशिवाय असलेला शोध हा अपूर्ण असतो कारण अडचणींना मात देत शोधाला गती देणे फार महत्वाचे असते आणि मी त्यालाच प्राधान्य दिले.
या तंत्रज्ञानाच्या युगात देखील वाचन हे होते असा माझा शेवटचा दिलासादायक निष्कर्ष होता. फक्त वाचन हे निरंतर असायला हवे असे मला वाटते. वाचन ही कधीच न संपणारी गोष्ट आहे आणि वाचनाचा आयुष्यात कधी ना कधी उपयोग होतोच फक्त गरज आहे ती वाचत राहण्याची!


Sunday, 27 August 2017

हिंदी चीनी भाई भाई?



  मानवी संस्कृतीच्या उदयासह युद्ध संस्कृतीचा देखील उदय झाला.काळानुसार युद्ध संस्कृतीत बदल घडत गेले.भारतात इंग्रज येण्यापूर्वी भारत हा देश छोट्या छोट्या संस्थानांमधे विभागला गेला होता.सगळे राजे आपआपल्या संस्थानांच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते.युद्धातूनच कुठलीही संपन्नता प्राप्त करणे हाच त्यांचा मोठा उद्देश्य होता.काळानुसार त्या युद्धसरणीत सुद्धा बदल घडत गेले.छोट्या छोट्या वादातून सुद्धा युद्धाची परिस्थिती निर्माण होत गेली.इतिहासात झालेल्या दोन महायुद्धांचे उदाहरण घेतले तर ही युद्धे आपल्याला टाळता आली असती पण तरीसुद्धा ही युद्धे झाली आणि आजपर्यंत त्यांचे पडसाद अजूनही मनपटलावर कायम आहेत.



  प्राचीन काळातील युद्धे किंवा आधुनिक विश्वयुद्धे ही सर्व छोट्या कारणाने सुरू झाली आणि नंतर त्यांनी विशालकाय रूप धारण केले.आज युद्ध हे केवळ सैन्यापुरतेच मर्यादित न राहता ते मानवी संस्कृती संपवण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.इतिहासामधील उदाहरण घेतले तर आत्तापर्यंत झालेल्या युद्धांमधे मानवहानी बरोबरच कला,संस्कृती इत्यादी गोष्टींचा देखील नाश झालेला आहे.आधुनिक काळात झालेल्या युद्धांमधे सैन्यांबरोबरच अनेक मुले,स्त्रिया,वृद्ध माणसे व सामान्य नागरीक सुद्धा बळी पडले ज्यांचा युद्धांशी काडीमात्रही संबंध नव्हता.युद्धांचे एवढे गंभीर परिणाम आहेत हे महित असून सुद्धा युद्धे ही घडलेली आहेत.  





  सद्य स्थितीचा अभ्यास करताना देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यासाठी भारत आणि चीन यांच्यामधला तणाव कारणीभूत आहे.चीनमधली आर्थिक परिस्थिती बिघडलेली असून त्यांना त्यांच्या देशातील मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा माल`निर्यात करायला अडचण होत आहे.सध्या जगामधे असलेली आर्थिक मंदी यामागचे कारण आहे.तर हा सगळा देशातंर्गत होणारा राजकीय असंतोष दबविण्यासाठी बाह्य शत्रू दाखवण्याची गरज भासते त्यासाठीच चीन हा भारताशी कुरापत काढत आहे. डोकलामचा तिढा कायम असताना चीनने सिक्किमबद्दल आक्रमक वक्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे यावरून चीनला कुठलीही गोष्ट धाक दाखवून साध्य करायच्या आहेत हे दिसून येत आहे.

  या सगळ्यात पकिस्तानची भूमिका बघणे जास्त महत्वाचे ठरते.सध्या चालू असलेल्या डोकलामच्या संघर्षासाठी पाकिस्तान कारणीभूत आहे असे मला वाटते कारण प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान हा भारत विरोधी असल्याचे दाखवतो.यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधे असलेला चीन व पाकिस्तान यांचा इकोनॉमिक कॉरिडोर हे उत्तम उदाहरण ठरेल.चीनने साठ अब्ज डॉलर्स खर्च या कॉरिडोरवरती केलेला आहे.पण जर उद्या भारत आणि पाकिस्तान या देशांचे संबंध बिघडले आणि जर भारताने या कॉरिडोरवरती दबाव आणला तर चीनचे साठ अब्ज डॉलर्स पाण्यात जातील.ही चिंता सध्या चीनला भेडसावत आहे आणि यासाठीच आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम चीन वेगवेगळ्या पद्धतींने करत आहे. 

  


  या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध होण्याचे संकेत फार कमी आहेत पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि चीन हा देश वाटतो तेवढा शक्तिशाली नाही आणि भारत हा देश वाटतो तेवढा दुर्बळ नाही.सध्या केलेली अमेरिका आणि इस्त्राईलशी मैत्री व अमेरिका,जपान त्यांच्याबरोबर संयुक्तपणे केलेला युद्धसराव ह्या भारताच्या जमेच्या बाजू ठरतील यात तिळमात्र शंका नाही. सध्याचा भारत हा ६२ चा भारत नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवं.सध्या असलेलं अजित कुमार डोवाल तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र  मोदींजींचे नेतृव देखील आपल्याला फायदेशीर ठरेल.

  युद्ध हे अटळ असते असे  म्हणतात पण आपण जर एकत्र येऊन शांतपणे चर्चा केली तसेच एकत्रित प्रश्न सोडवले तर युद्धाची गरज नसते असे मला वाटते.जर आत्ता युद्ध झाले तरी सुद्धा हा भारत १९६७ मधल्या भारतासारखा युद्धाला तोंड देईल यात कुठलीही शंका नाही.  




x

Tuesday, 28 March 2017

बदल


गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशीच मी हा ब्लॉग सुरु केला होता.वर्षांतील दिवसांप्रमाणेच मी सुध्दा माझ्यात काही बदल केले.लवकर येणारा राग आजकाल क्वचितच येतो,समोरच्याला समजून घेणे वाढले असे कित्येक बदल स्वतःमधे केले.स्वतःचे बदल स्वतः सांगण्यापेक्षा लोकांच्या लक्षात जर ते बदल आले तर मनाला जास्त आनंद मिळतो.हे परिवर्तन कसे होते,त्यासाठी काय करावे लागते हे मी यावेळेस अनुभवले.तोच अनुभव आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे.

मनुष्याच्या आयुष्यात बदल हा गरजेचा असतो.व्यक्तिमत्व विकसन हे परिवर्तनामुळे होते.काल मी जो होतो,आज मी काही वेगळा आहे यात बदल हा महत्त्वाचा घटक ठरतो.कुठलाही बदल हा सहज घडत नाही.प्रत्येक बदलाला काहीतरी स्रोत असतो.कोणाच्या तरी सांगण्यावरून,कोणाकडून तरी प्रेरित होऊन बदल होतो.




स्वतःचा घेतलेला शोध म्हणजेच आत्मशोध ही बदल करण्यापूर्वीची पहिली पायरी असते असे मला वाटते.आपण काय करतो,आपण कसे वागतो,आपण कसा विचार करतो,आपण केलेला विचार कसा कृतीत आणतो हे सर्व आत्मशोधात येते.भूतकाळात झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या वर्तमानकाळात त्याचबरोबर भविष्यकाळात देखील होणार नाहीत ना याची काळजी आत्मशोधात घ्यावी लागते. 

आत्मशोधानंतर येते ती परिवर्तनाची तयारी.परिवर्तन करण्यापूर्वी आपण परिवर्तन करायला तयार आहोत की नाही याचा विचार आत्मशोधानंतर करावा लागतो.जवळच्या माणसांना आपला बदल आवडेल की नाही याचा विचार परिवर्तनापूर्वीच्या तयारीत करावा लागतो. 

यात सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे 'बदल'.आपल्या आयुष्यात आपण भरपूर चुका करतो.चुका कळाल्यावर माफी देखील मागतो.काही वेळा चुकांची पुनरावृत्ती देखील होते.तरीसुध्दा जवळची माणसं आपल्याला माफ करतात.पण आपण कधी याचा विचार करतो?आयुष्यात कितीवेळा आपल्या चुकांसाठी ती माणसं आपल्याला माफ करणार?शेवटी ती पण माणसंच असतात.या सगळ्या गोष्टींसाठी बदल हा आवश्यक असतो.

व्यक्तिगत बदल हा समाज घडवायला मदत करतो असे मला वाटते.काल झालेली चूक आज पुन्हा झाली नाही हे बदल घडण्याचे उत्तम उदाहरण आहे.झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप व्यक्त करण्यापेक्षा स्वतःमधे केलेला बदल हाच मनुष्याला सर्वाधिक आनंद देतो.परस्परांमधील असलेली नाती टिकवण्याचे काम बदल करतो.स्वतःचे केलेले सिंहावलोकन आणि त्यानंतर स्वतःमधे केलेला आमूलाग्र बदल याचा आनंद मनुष्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून राहतो.   

Sunday, 13 November 2016

वाढदिवस..








कधी कधी मला प्रश्न पडतो कि वाढदिवस आपण का साजरा करतो?सगळ्यांना जेवायला बोलवतो,केक कापतो,भेटवस्तू मिळतात या सर्व गोष्टी  यावेळीस घडतात पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर या दिवशी वाढणाऱ्या वयासाठी आनंद व्यक्त करायचा कि आयुष्यातील कमी होणाऱ्या दिवसांसाठी दुःख व्यक्त करायचे हा प्रश्न मला पडतो.

आपण मुख्यतः आनंद म्हणून वाढदिवसाकडे बघतो.वर्षभरातून एकदाच येतो.आपल्या मनासारख्या गोष्टी या दिवशी होतात म्हणून कदाचित आपल्याला या दिवसाचे अप्रूप वाटते.लहानपणी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा वाढदिवस,आपण मोठे झाल्यावर त्याचे साजरा करण्याचे प्रमाण कमी होते.वयानुसार जशी अक्कल येते तसे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण बदलते.

आजकाल  मला वाढदिवस साजरा करण्याच्या काही पद्धती खटकतात.लहानपणी केकचा प्रत्येक टुकडा खाणारे आपण आजकाल सरळ तोंडाला केक फासतो हे अक्कल खूपच जास्त आल्याचे प्रमाण वाटते.
केक फासायचाच असेल तर तो थोड्या प्रमाणात फासला तर काही हरकत नाही पण लोक सरळ आख्खा केक तोंडाला फासतात,त्यात त्या बिचाऱ्या केकचा काय दोष? एकूणतः मला हि पद्धत चुकिची वाटते कारण माझ्या बाबतीत केक फासण्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे.


हाच तो २०१४ मधे घडलेला दुर्देवी प्रसंग 😉



काही वेळा केकपेक्षा या दिवशी केलेल्या चांगल्या कृती,संकल्प आपल्याला कायम लक्षात राहतात.केक खाऊन आलेल्या क्षणभंगुर गोडव्यापेक्षा या दिवशी केलेली कुठलीही चांगली कृती माणसाला आयुष्यभर टिकून राहणारा गोडवा देते.


वाढदिवस हा स्वतःशी संवाद साधायला असतो असे मला वाटते.वर्षभरात मी किती माणसे जोडली,त्यांच्याशी
किती बोललो,कोणकोणत्या चांगल्या कृती मी वर्षभरात केल्या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे या दिवशी स्वतःला विचारायला हवीत.या दिवशी मिळणारी प्रत्येक उत्तरे आपल्याला आयुष्यात फार उपयोगी ठरतात.स्वतःचे केलेले सिंहावलोकन हे आपल्या भविष्यासाठी फायदेशीर असते.स्वतःच्या वर्षभरात झालेल्या चुका त्या भविष्यात परत होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.


आयुष्यातील दुसरा वाढदिवस 


प्रत्येकाचा वाढदिवस असतो.तो कसा साजरा करायला हवा,त्या दिवशी काय करायला हवे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो फक्त साजरा न करता आपल्या वर्षभराच्या किंवा आयुष्यातील गोष्टींचे चिंतन झाले तर त्या वाढदिवसाला अर्थ असतो असे माझे मत आहे.बाकी वाढणाऱ्या वयासाठी आनंद व्यक्त करायचा कि आयुष्यातील कमी होणाऱ्या दिवसांसाठी दुःख व्यक्त करायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे!! 

Friday, 11 November 2016

Okay...











 Okay…









'Hmm,Okay' असे शब्द आजकाल माझ्या फार डोक्यात जातात.'Whatsapp,Facebook' कुठेही Hmm,Okay अशाप्रकारच्या शब्दांचे रिप्लाय आले कि डोके आपटून घ्यावेसे वाटते. संवादाला कुठेतरी सुरुवात होत असताना मोबाईलच्या स्क्रिन वर असे शब्द झळकले कि क्षणार्धात मोबाईलचे तुकडे करावसे वाटतात.माझे चिडण्यामागचे एवढंच कारण आहे कि लोक मुद्दामून अशा शब्दांचा वापर करतात.


संवाद हि दोन माणसांची ओळख होण्याची पहिली पायरी असते पण असे शब्द त्यामधे अडथळा निर्माण करतात.संवाद सुरू होत 
असताना अशा शब्दांची गरज नसते.सुरु होणारा संवाद लगेच बंद करण्याचे काम असे शब्द करतात.अशा शब्दांच्या वापरामुळे 
माणूस जोडण्याचे काम करणारा संवाद फिका पडतो.दोन लोकांच्या संवादामधे एखाद्या माणसाला बोलायचे असते,मनातील सर्व 
सांगायचे असते,रोजच्या आयुष्यातील घटना सांगायच्या असतात पण असे शब्द वापरल्यामुळे तो निराश होतो.निराश झाल्यावर 
पुढे त्याची संवाद साधायची इच्छा निघून जाते.



काही काही वेळा फक्त बोअर होत आहे म्हणून पण लोक अशा शब्दांचा वापर करतात.'मला बोअर होत आहे
असे स्पष्ट का बोलत नाही याचे मला अद्याप कारण सापडलेले नाही.समोरच्या माणसांची किम्मत शून्य ठरवून हे 
बिनधास्त Hmm,Okay शब्दांचा वापर करतात तर कधी कधी Ttyl या शब्दाचा वापर करतात. 



लोकं काहीवेळा दुसरा कुठला रिप्लाय  सुचल्यामुळे Hmm,Okay अशा प्रकारच्या शब्दांचा वापर रिप्लाय देण्यासाठी करतात.यावेळी त्यांना दोष देता येत नाही कारण समोरचा माणूस त्यावेळीस नीट संवाद साधत नसतो पण माझ्या मते अशावेळीस 
Hmm,Okay असे शब्द टाळून संवादात वेगळ्या विषयांवर बोलायला हवेवेगळ्या गोष्टींवर विषय गेला कि असे शब्द 
आपोआप मागे पडतात.


   




   
    आपण Whatsapp,Facebook भरपूर वापरतो.आपली ती दैनंदिन गरज झाली आहे म्हणूनच अशा साधनांचा संवाद 
साधण्यासाठी वापर करताना आपण भान राखले पाहिजेल.समोरून भेटताना आपण मुख्यतः Hmm,Okay असे शब्द फार कमी वापरतो.आपला फारच मुक्त संवाद होतो.मुक्त संवादामुळे आपण लगेच एकमेकांशी जोडले जातो पण ऑनलाइन प्रकारात तेवढाच 
मुक्तपणे संवाद साधला जात नाही.मनातील भावना इमोजी द्वारे बाहेर पडतात.इमोजी वरून व्यक्तिच्या भावना ओळखल्या जातात.
जेवढा समोर जाऊन,भेटून,बोलून जिवंत संवाद साधला जातो तेवढ्याच ताकदीचा ऑनलाइन संवाद होत नाही हे वास्तव आहे आणि तो झाला तरी त्याच्या आधारावर झालेली नविन नाती जास्तकाळ टिकत नाहीत.मानवी आयुष्यात संवाद हा फार महत्वाचा आहे.संवादाचा योग्य वापर व्यक्तीला जास्तीतजास्त चांगली  आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडून देतो.