Monday, 15 June 2020

ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही बोलून बघा!


डिप्रेशन म्हणजे नक्की काय?
डोकं रिकामं केलं तरी
त्याला उत्तर 
देता आलं नाही
रात्र जागवत असतो म्हणे.

चित्रविचित्र रात्र असली 
तरी तो जागतो 
रिकाम्या नभाकडे 
एकटक पाहत असतो.. 
त्यावेळी त्याला 
कसली शुद्ध नसते 
अशातच 
रात्रीच्या नीरव शांततेत 
दूर कुठेतरी 
कुत्रीही भुंकत असतात 
उगाचच 
शांततेला आव्हान. 

तो तरी निश्चलपणे
नजर कायम ठेवतो
काय माहित 
रिकाम्या नभात
कुणाला शोधत असतो 
तेव्हा खोल गेलेले डोळे 
डोळ्यांखालची वर्तुळे
उगाचच भयानक वाटतात 
डोक्यावरचे 
दोन-चारच 
पांढरे केस
वेगळे वाटतात 
हे असं असतं का डिप्रेशन? 

बाह्य रूप बदललं तरी 
तो आतून किती पूर्ण आहे? 
भयाण रिकाम्या शांततेत 
त्याचा मोठा आवाज आहे 
गालावर सुकून गेलेल्या 
आसवांमध्ये नक्की 
कसली भीती 
दाटली आहे? 

त्याच्या डोळ्याखालच्या 
वर्तुळात हरवताना 
विचाराने दिशा पकडली

आता डिप्रेशन म्हणजे नक्की काय? 
याचं उत्तर मिळालं होतं..
रात्र जागवली याचं दुःख होतंच
पण खोल गेलेल्या डोळ्यांनी 
आज डिप्रेशन पाहिलं होतं!


मागच्याच वर्षी ही कविता लिहिली होती. तेव्हा डिप्रेशन म्हणजे नक्की काय असतं याचाच विचार डोक्यात चालू होता. त्या विचारामुळे मला अनेक प्रश्न पडत होते. 

डोक्यात चाललेले नकारात्मक विचार, एकटेपणा, सतत मिळणारं अपयश, नाकारल्याची भावना, जवळच्या व्यक्तींकडून होणारं दुर्लक्ष किंवा होणारा त्रास, कोणीतरी कमी लेखत असल्याची भावना यांसारख्या गोष्टींमुळे डिप्रेशन निर्माण होतं का? आणि जर होत असेल तर याचा बाह्य रूपावरही परिणाम होतो का? आणि बाह्य रूप जरी बदललं तरी प्रश्न कायम राहतात का उत्तरे मिळतात? यांसारखे प्रश्न मला सतत पडत होते. डिप्रेशनवर कविता लिहिण्याच्या नादात मीही ती phase अनुभवत होतो. 

पण या ड्रिपेशनचा विचार करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, मनुष्य जेव्हा जन्माला येतो. तेव्हा त्याच्या डोक्यात काहीच गोष्टी नसतात. टोटल कोरी पाटी असते. पण जसजसं आयुष्य सुरू होतं. तसं त्याच्याकडे जबाबदार्‍या येतात. त्यांच्याच जोडीला नवीन नाती येतात.

ती नाती सांभाळत असतानाच मूलभूत गरजांचाही त्याला विचार करायला लागतो. सगळी कसरतच असते ही. या कसरतीत काहीजण लगेच सराईत होतात तर काहींना वेळ लागतो. पण प्रत्येकाला ही कसरत करावीच लागते. पण या कसरतीच्या खेळात स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आपण या कसरतीत एवढं गुंतून जातो की आपल्याला आपला विसर पडतो.

हा विसर मग अनेक प्रश्न निर्माण करतो. त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो. स्वतःच्या पातळीवर किंवा जवळच्या नात्यांची मदत घेऊन, पण एकाबाजूला आपल्याला कसरतीतही जायचं असतं. तिच्यातील स्पर्धा आपल्याला खुणावत असते. त्यासाठी आपण काहीवेळा प्रश्न तसेच ठेवून परत कसरतीत घुसतो. तोपर्यंत त्या प्रश्नांचा ढिग होण्यास सुरवात होते. एकामागून एक प्रश्न असे ते येतच राहतात. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.

एकेदिवशी मग आपल्याला त्याची जाणीव होते. अशावेळी तुम्ही त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करता, जवळच्या नात्यांची मदत घेता, त्यांच्याकडं व्यक्त होता, मनात कसलाही विचार न ठेवता तुम्ही ती उत्तरं मिळवण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागता. 

पण याचं दुसरं गंभीर टोक म्हणजे मृत्यू. एवढे प्रश्न समोर आहेत आणि त्यांचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे मृत्यू अशी भावना तेव्हा तयार होते. तुम्हाला कोणताही त्रास नको असतो. प्रश्नांच्या पलीकडचं जग तुम्हाला खुणावत असतं. कसरतीच्या नादी लागून स्वतःमध्ये केलेले बदल तुम्हाला आपले वाटत नाही. एकटेपणा जरी असला तरी तो आपला वाटतो.तुमची ही भावना दुसऱ्यांसाठी जरी नकारात्मक असली तरी तुमच्यासाठी तेव्हा ती सकारात्मक होऊन जाते. अंतिम निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही त्याला अधीन होता. आणि मग उरते फक्त स्मशानशांतता! 

आता आपल्याला ठरवायचं आहे. कारण कसरत तर सर्वांनाच करायची आहे. तिला सोडून चालणार नाहीये. आपणच जर पहिल्यापासूनच प्रश्न सोडवत गेलो तर वरची परिस्थिती निर्माणच होणार नाही. आता हे प्रश्न नक्की कोणते आहेत याचा प्रत्येकाने आपापला विचार करून ठरवायचे आहेत. एकदा का प्रश्न शोधले की परत त्यांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ नाही लागणार.

तुम्हाला हे जर अवघड जात असेल तर यासाठी बिनधास्त दुसर्‍यांकडे मदत मागा, माझ्याकडे मागा. मनात कसलीही आडकाठी न ठेवता, आपल्याला कोणीतरी जज करेल ही भावना न आणता मोकळेपणानं व्यक्त व्हा कारण ते गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांनाही पडलेले असतील, त्यांचे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. यात प्रश्न शोधणं महत्त्वाचं आहे.

आणि त्याबरोबरच हेही लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच असतात. कदाचित तेच त्या प्रश्नांचं उत्तर असतं. सो उत्तरं मिळवण्याच्या मागे न लागता प्रश्न शोधायला शिका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे आयुष्य कठीणच आहे. आपल्याला सर्वांची साथ घेऊन, वेळेप्रसंगी दुसर्‍यांना साथ देऊन ते फक्त जगायचं आहे. आपल्या हक्काचं बनवायचं आहे. जगण्यात मजा आहे बाॅस, अडचणी नसतील तर ते आयुष्य कसले. आणि ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही एकदा बोलून बघा!


Thursday, 16 April 2020

घालमेल


खरंतर खूप दिवसांपासून काय लिहू असा प्रश्न पडला होता. एकतर मला उगाच काहीतरी लिहायचं आहे म्हणून काहीही लिहायला आवडत नाही. जोपर्यंत आतून असं काही दाटून येत नाही. माझे दुःख, माझे सुख मनाची परिसीमा गाठत नाही तोपर्यंत माझी लेखणी थंड असते. हे वागणं थोडं अतिशयोक्तीचं वाटलं तरी हेच सत्य आहे. असो. माझ्या या ब्लॉगला गुढीपाडव्याच्या दिवशी पाच वर्षं पूर्ण झाली. २०१६च्या सुरवातीला म्हणजे ८ एप्रिलला ब्लॉग सुरू केला.
तेव्हा स्वतःच्या आयुष्याचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून चला ब्लॉग लिहूयात असा अजिबातच विचार केला नव्हता. खूपजण लिहितात म्हणून आपणही लिहूयात, वाहत्या गंगेत आपलेही हात धुवून घेऊयात असे तेव्हा काही हेतू नव्हते. मी लिहलेल्या सर्व लेखांचं, एकाच ठिकाणी, छानसं काहीतरी डॉक्युमेंटेशन होईल, केवळ हाच प्रांजळ विचार मनाशी बांधून ब्लॉगला सुरवात केली.
पण नंतर जसे दिवस जायला लागले तसे लेखांमध्ये स्वतःचे चित्र उमटायला लागले. मी स्वतःला या माध्यमातून जास्त व्यक्त करायला लागलो. मी लिहीत असलेल्या लेखांमधूनच माझा (मी मानत असलेला) स्वार्थीपणा माझ्या नकळतच लेखांमध्ये डोकवायला लागला. मग तो 'बदल, आत्मशोध ते आत्मबोध, वाढदिवस' यांसारख्या लेखांमधून आपल्याला जाणवलं असेल. नंतर मला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांवरही मी लेखमाला सुरू केली. त्यातूनही आपल्याला जाणवलंच असेल. स्वतःची अशी मानसिक, सामाजिक, बौद्धिक वाढ या ब्लॉगच्या निमित्ताने व्हायला लागली.

पण मग मधे म्हणजे यंदाच्याच वर्षी जानेवारीमध्ये असं वाटायला लागलं की ही वाढ चांगली का वाईट? यातून फक्त माझा स्वार्थ साधला जातोय का? सामाजिक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे लिखाण होतंय का? प्रत्येक जण स्वतःची अशी, स्वतःच्याच आयुष्यात लढाई लढतोय मग आपली लढाई किंवा आपलं दुखणं आपण सकल जनांना का सांगतोय? आपल्या आयुष्यात असं काय दडलंय की त्याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवीये? आपण आपल्या गोष्टी दुसऱ्यांवर लादतोय का? आपलं आयुष्य किती भारीये किंवा आपण आयुष्यात असे काय तीर मारलेत म्हणून कुठंतरी नोंदवून ठेवण्याची खरंच गरज आहे का? असे अनेक प्रश्न मनाला इंगळ्या डसल्यासारखं अहोरात्र डसत होते. तेव्हा खरंच सांगायचं झालं तर त्यांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही. वेळ जाऊ दिला. लिखाण थांबवलं. इन्स्टावरच्या 'मयुरस्पीकस्' नावाच्या पेजवरही शांत राहिलो.


पण आजकाल या क्वारंटिनमध्ये एखादं जुनं दुखणं परत कसं नंतर वर तोंड काढतं अगदी तसंच या भूतकाळामध्ये पडलेल्या प्रश्नांनी मला सतावलं आहे. कोणाची एक्स गर्लफ्रेंडही एवढं सतावत नाही. रिकाम्या डोक्यात खरंच खूप विचित्र विचार येतात. आणि आत्ताच या प्रश्नांची जाणीव होण्याचं मुख्य कारण म्हणजे या महिन्यातच ब्लॉग सुरू करून, पूर्ण झालेली सहा वर्षें. या सहा वर्षात मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत. लिखाणातून मला प्राप्त होणारा आनंद, म्हणजेच माझा सेल्फ हॅपिनेस हा दुसऱ्यांसाठीही आनंदच असतो का? असा प्रत्येक लेखकाला प्रश्न पडायला हवा. खरंच कोणी केलाय का असा विचार? का आपण एक लेखक म्हणून, एक ब्लॉगर म्हणून, एक कवी म्हणून आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वेळ वाया घालवतोय?


माझ्या परिप्रेक्ष्यात बोलायचे झाले तर मी एवढा मोठा किंवा महान नाहीये की माझे लेख सर्वांनी वाचावेत. सर्वांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल असेही काही त्यात नाहीये. मी आतापर्यंत ब्लॉगवरचा प्रत्येक लेख समाजमाध्यमांवर शेअर करत आलोय. तेव्हा माझ्या मनात नक्की कोणता विचार होता? अगदी आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा लेख लिहायलाही मला ब्लॉगचाच आधार घ्यायला लागतोय आणि हीच खरी शोकांतिका आहे. मला तुमच्याकडून याची उत्तरं हवी आहेत. आणि कदाचित त्या उत्तरांवरच या ब्लॉगचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे कृपया लवकरात लवकर मला सांगा. जरी कशाची उत्तरं दिली नाही तरी तुम्हाला आत्तापर्यंत या ब्लॉगनं काय शिकवलं आहे ते सांगितलं तरी मला कळू शकेल.


ता. क. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमची उत्तरं कितीही रोखठोक आणि पाषाणहृदयी वाटत असली तरी मला चालू शकतील. फक्त ज्यांनी आजपावेतो ब्लॉगवरचं काही वाचलं नसेल तर ते सगळं वाचून झाल्यावरच आपलं मत व्यक्त करा. इथे प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त त्याचा स्वैराचार किंवा दुरूपयोग नकोय. बाकी आपण सुज्ञ आहात!

Saturday, 26 October 2019

'सिटिझन जर्नालिझमला नवा पर्याय'




  घरातून रोज कॉलेजला जाताना मला विविध गोष्टींचं दर्शन होतं. रोजचाच रस्ता असल्याने रस्त्यावरील एकएक गोष्ट नजरेत बसते. खड्डयांच्या गर्दीमध्ये हरवलेला रस्ता, फुटपाथवर झालेलं अतिक्रमण, ऐन कामाच्या वेळी लागलेलं ट्रॅफिक, पीएमपीच्या दारात लोंबकळणारे प्रवासी, दिवसाढवळ्या चालू असलेले पथदिवे असे अनेक 'प्रॉब्लेम्स' रोज पाहायला मिळतात. मी पत्रकारितेचा विद्यार्थी असल्याने या समस्या मनाला अधिक लागतात. वरवर या साध्या दिसत असल्या तरी पुणेकरांना यांचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. माध्यमंही या समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे मोठंच प्रश्नचिन्ह आहे. सारासार विचार केला तर या समस्यांवर कोणाकडेच ठोस उत्तर नाहीये, पण किमान पुणे शहरात या समस्या अस्तित्वात आहेत याची जाणीव तरी सर्वांना व्हायला हवी.
  
  वृत्तपत्रांतून 'वाचकांचा पत्रव्यवहार'मधूनच यांसारख्या बातम्या आपल्याला कळतात, पण दृक्श्राव्य माध्यमांवर यांसारख्या विषयांची वानवाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची नितांत गरज आहे. सध्याच्या या डिजिटल युगात योग्य पर्यायाची निवड करणं क्रमप्राप्त आहे, आणि म्हणूनच तीन मित्रांनी एकत्र येऊन 'न्यूजलूक' (Newslook) या 'सिटिझन जर्नालिझम'वर आधारित पची निर्मिती केली आहे. प्रतिक मासुळकर, रोहित गिते, अक्षय नारखेडे या तरुणांनी वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजेच Letters to the Editor याच्यापुढे जाऊन, आजच्या डिजिटल युगात या पच्या माध्यमातून भक्कम पाऊल टाकलं आहे.



  
  रस्त्यावरून जाताना दिसलेली कुठलीही समस्या असेल, लगेच त्याचं छायाचित्र किंवा व्हीडिओ काढून या ॲपवर टाकता येतो. कोणतंही छायाचित्र किंवा व्हीडिओ जतन करून नंतर वापरण्याची या ॲपमध्ये सोय नसल्याने हेच या ॲपचं वेगळेपण आहे. यातूनच पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली 'विश्वासार्हता' जपली जाते. छायाचित्र किंवा व्हीडिओ पोस्टमध्ये समाविष्ट करणं बंधनकारक असल्याने या ॲपवर 'फेक न्यूज' पोस्ट करता येत नाही. याचबरोबर छायाचित्रं आणि व्हीडिओला कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर या ॲपमुळे आता लोकांच्या 'खऱ्या समस्या' समोर येणं सोपं होणार आहे.
  ही सर्व झाली या ॲपची माहिती. पण या ॲपमुळे नक्की काय परिणाम साध्य होत आहेत की होणार आहेत हेही आपण पाहायला हवं.
  
  सामान्य नागरिकांच्या हातात 'न्यूजलूक'च्या माध्यमातून एक अनोखी ताकद आली आहे. कुठल्याही वृत्तसंस्थेला कोणाचे तरी पाठबळ असतं त्यामुळे कदाचित त्या वृत्तसंस्थेवर, काम करण्याच्या शैलीवर फरक पडतो पण 'न्यूजलूक' या बाबतीत फार वेगळं आहे. टीआरपीचे गणित आणि कोणत्याही आयडोलाॅजीचे पाठबळ नसल्याने सर्वसमावेशक न्यूज कंन्टेट आपल्याला 'न्यूजलूक'वर पाहायला मिळतो.

  आपल्या आयुष्यात आपल्याला कुठल्याही आपत्तीला कधीही सामोरं जावं लागतं. आत्ताचंच उदाहरण घेतलं तर पुण्याच्या दक्षिण भागात म्हणजेच कात्रज, लेकटाऊन परिसरात अंबिल ओढयाला पूर आला होता. अशावेळी नागरिकांना तातडीच्या आणि गरजेच्या सूचना द्यायला कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दुर्दैवाने व्हाॅटसप आणि बाकीच्या सोशल ॲपवरूनही काही दिसत नव्हतं. यांसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत 'न्यूजलूक' सारख्या ॲपचा नक्कीच उपयोग होईल. नागरिकच, नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत सूचना, संदेश देतील. कुठे रस्ता बंद केलाय, कुठले रस्ते टाळले पाहिजेत, कुठे मदतीची गरज आहे यांसारख्या प्रश्नांना या ॲपवरून थेट उत्तर मिळणार आहे.
  
  या ॲपचा आणखी एक परिणाम म्हणजे लोकं आपल्या समस्या मांडणार आणि बाकीचे त्या समस्यांचं लवकरात लवकर कसं निराकरण होईल हे पाहणार. यातूनच वेगवेगळे स्थानिक समुदाय बनतील. हेच समुदाय लोकांसाठी काम करतील, लोकांच्याच विकासाचा विचार करतील. 'स्थानिक ते स्थानिक' असा प्रवास नक्कीच पुणे शहराला एक नवीन दिशा मिळवून देईल यात शंका नाही.

  शेवटी फक्त एकच सांगणं आहे, की हे ॲप जरूर वापरून पहा. कुठलीही गोष्ट वापरून किंवा जवळून पाहिल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल काहीतरी मत बनवणं चुकीचे आहे. त्यामुळेच एकदा वापरा, नीट अनुभवा आणि आम्हाला नक्की कळवा!
  
  खालील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर लिंकही दिली आहे. तसेच तुम्ही आमच्याशी फेसबुक, इन्स्टाग्राम यावरूनही कनेक्ट होऊ शकता. त्याच्याही खाली लिंक्स दिलेल्या आहेत.

इन्स्टाग्राम: https://instagram.com/newslookpune?igshid=1jtxfxg7i5vxc

वेबसाइट: www.newslookmedia.com

ई-मेल: info@newslookmedia.com






Sunday, 7 April 2019

असे पाहुणे येती....



जानेवारी महिन्यात युरोप व मध्य आशियातून आपल्याकडे अनेक पंखवाले पाहुणे दाखल होत असतात. पृथ्वीवर एकाच वेळी  उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळे हंगाम आणि तापमान असते. याचा फायदा घेऊन अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या राहण्याच्या जागा काही महिन्यांसाठी बदलतात. साधारण नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात हे स्थलांतर होतेयामध्ये विविध पाणपक्ष्यांचा आणि माळावरच्या पक्ष्यांचा समावेश असतो. सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. यामध्ये थापट्यानकटाशेंडीबदकलालसरीथोरले व धाकटे मरालतरंगगडवालचक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे हंस येतात. चमचाअवाकतुतवारशेकाट्याकारंडवउचाटसोनचिलखाकुरव असे पाणथळीचे पक्षीही असून गप्पीदासकस्तुरशंकररोहितधोबीक्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणाशिक्राकवड्या हे शिकारी पक्षीही येतात. 
हे सर्व स्थलांतरित पक्षी पाहायला कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. यातलेच "महाराष्ट्रातील भरतपूर" म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे भिगवण! 


भिगवणची सांज 


पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रतला परिसर म्हणजे भिगवण. भीमा नदीवर बांधलेल्या धरणामुळे डिकसळ पारेवाडी आणि दळज कुंभारगाव हे दोन भाग पाणथळीच्या जागा बनल्या असून इथे दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. या परिसरातरोहित पक्षी अर्थात फ्लेमिंगो हजारोंच्या संख्येत पाहायला मिळतात. याच पाणथळीत अनेक प्रकारची बदकंबगळेकरकोचे तर पाहायला मिळतातचजोडीला इतर पाणपक्षी आणि माळरानावर आढळणारे पक्षी इथे हमखास दर्शन देतात. पुणे आणि सोलापूर शहरांपासून अवघ्या सव्वाशे किलोमीटर्सच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणाला हमखास स्थलांतरित पक्षी दिसण्यामुळे अलीकडेच खूप लोकप्रियता मिळायला लागली आहे. 


रोहित अर्थातच फ्लेमिंगो पक्षी 

चमच्या 

चित्रबलाक आणि चमच्यांचा समूह 

थंडीच्या काळात आपल्याकडे येणाऱ्या आणि दीर्घकाळ मुक्काम ठोकणाऱ्या काही पक्ष्यांच्या लकबी व सवयींच्या जोडीला केल्या जाणाऱ्या वैशिष्टयपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिले  तर कित्येक वैविध्यपूर्ण गोष्टी नजरेस पडतात. या निरीक्षणात सहजच पाणथळीत आपल्या चमच्यासारख्या चोचीने पाणी ढवळत आणि खाद्य पकडत फिरणारा युरेशिअन स्पुनबिल अर्थात चमच्या पक्षी नजरेस पडतो. या चमच्याच्या जोडीलाच भरपूर संख्येने दिसणारी बदके म्हणजेच रुडी शेलडक ऊर्फ ब्राह्मणी बदक हिमालयातून आपल्याकडे थंडीसाठी स्थलांतर करून आलेली दिसतात. सौम्य हलक्या भगव्या रंगाची ही बदके आपल्या थव्यात मुक्तपणे फिरताना पाहणेही आनंदाचा अनुभव असतो. रुडी शेलडक्सच्याखेरीज कुंभारगाव परिसरात पांढऱ्या मानेचे करकोचेचित्रबलाक, राखी व जांभळा बगळापाणकोंबडयाकोतवालघारीगरुड अशा अनेक सुपरिचित पक्ष्यांच्या जोडीनेच भिगवण परिसरात गेली काही वर्षे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी अगदी हजारोंच्या संख्येने वास्तव्यास येत आहेत. 

रोहित 

साधारण साठ इंचांपर्यंत वाढणारा नर रोहित पक्षी तर माणसापेक्षाही उंच वाटू शकतो. या रोहित पक्ष्याचे वैशिष्टय म्हणजे याचा अतिशय उजळ रंगतो  रंग त्याला त्याच्या सातत्यपूर्ण आहारामुळेच लाभत असतो. उलटा एस ठेवल्याप्रमाणे दिसणारी मान खाली घालूनस्वत:च्या वैशिष्टयपूर्ण वाकडया चोचीने उथळ पाणथळीच्या दलदलीतआपलं भक्ष्याच्या शोधार्थ  हिंडणारे हे रोहित दलदलीत सापडणाऱ्या सर्व जिवांसोबतच 'श्रीम्प्सनावाच्या कोळंब्या आवडीने खातातत्यातून त्यांना हा रंग कायम राखता येतो. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांच्या पिसांवरचे हे रंग दिसायला सुरुवात होतात. आश्चर्य म्हणजेया ‘स्टेबल डाएट’ची कमतरता असतेतेव्हा या रोहित पक्ष्यांचा रंग फिक्कट तर होतोच शिवाय खाण्याची कमतरता निर्माण झाल्यास ते चक्क प्रजोत्पत्ती करणे टाळतात. ही अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते सतत सुरक्षित आणि मुबलक खाणे उपलब्ध असेल अशा ठिकाणांना जाणे पसंत करतात. उजनी धरणाच्या पाणफुगवटयाने परिसरात निर्माण झालेली पाणथळ या रोहित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच आहे असे  म्हणायला हरकत नाही. 

सकाळच्या प्रहरी चित्रबलाक पक्षी न्याहारीचा आस्वाद घेताना  
मोठया संख्येने समूहात राहाणारे हे पक्षी हॉर्न वाजवल्यासारखा कलकलाट करून एकमेकांशी संवाद साधतात. याच जोडीला पंख फडफडवूनमान वेळावूनही ते मूक संभाषण करत असतात. समूहात राहणाऱ्या या पक्ष्याला त्याच्या निवासाजवळ इतर प्राणी-पक्षी अथवा मानवी हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही. हे असे हस्तक्षेप व आवाज सतत व्हायला लागले तर ते त्या निवासातून बाहेर पडतात. 

भिगवणची संध्याकाळ 

भिगवण परिसरात
 यावर्षी झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणसाठयात पाण्याचा फुगवटा जास्त आहे. यामुळे अगदी काठाकाठावर दिसणारे पक्षी कमी असूनहातात पुरेसा वेळ घेऊन गेल्याससूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा गाठल्यास पाणसाठयावर नांदणाऱ्या अनेक पक्ष्यांचे दर्शन हमखास होईल. सूर्योदयाच्या सुमारास पाखरांची पाणवठयावर येण्यासाठी सुरू झालेली लगबगरात्रीच्या विश्रांतीने ताजीतवानी होऊन आपले भक्ष्य म्हणून लहान पक्ष्यांना घाबरवणारी घार आणि तिच्या मागे जीव तोडून आणि जिवावर उदार होऊन लागणारा कोतवालथंड पाण्यात खोलवर डुबकी मारून ओले झालेले पंख सुकवण्यासाठी उन्हात बसलेले पाणकावळेआपले उंच पाय आवरत तुरुतुरु धावणाऱ्या शेकाटयाविजेच्या उंच खांबावर बसलेला मच्छीमार अशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची भिगवणची 'उडती दुनियापाहण्यासाठी भिगवणला एकदातरी जायलाच हवे.


भिगवणची 'उडती दुनिया' पाहण्यासाठी क्लिक करा... 


Sunday, 2 September 2018

मिसळ आणि मी!




मिसळबद्दल काय बोलायचे? पुण्याचे असाल तर मिसळबद्दल आपसूकच प्रेम निर्माण होते. पुण्यात राहून जर चांगली मिसळ खायची असेल तर ती नक्की कुठे मिळते हे माहित असायला हवे आणि हे जर माहित करून घ्यायचे असेल तर 'य' प्रमाणात पुण्यातील सर्व मिसळींचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हवा!

मी देखील चांगल्या मिसळीचा शोध घेताना अनेक मिसळींचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्यात ज्या मिसळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळून राहिलेली आहे ती म्हणजे 'रामनाथची मिसळ'.

मी पुण्याचा असलो तरी सुरूवातीला मला रामनाथ मिसळ माहित नव्हती. शाळेत असताना फक्त पोहयांबद्दलच प्रेम होते त्यामुळे बाहेर कधी मिसळ खायचा प्रश्न आला नाही. घरीच मिसळ खाऊन व्हायची. सुरुवातीला तिखट खात नसल्यामुळे अळणी मिसळच आवडायची. फक्त फरसाण 'य' प्रमाणात खायला मिळते म्हणून मी मिसळ खायचो. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा खरे मला मिसळीचे महत्व कळले. काॅलेजमुळे बाहेर जास्त वेळ असायचो. आणि वडापाव तरी किती वेळा खायचे मग वेगवेगळ्या ठिकाणी मिसळी ट्राय करायला लागलो. काॅलेजच्या कॅन्टीन पासून त्याची सुरुवात केली. या सगळ्या ट्राय प्रकरणामुळे मिसळींच्या किती अनेक प्रकारच्या टेस्ट असू शकतात याचा प्रत्यय आला. तिखट, खारट आणि गोड यांच्या पलीकडे पण काही चवी असू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. पुण्यातील वेगवेगळ्या भागांनुसार त्या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळीची चव ठरते असा कयास मी बांधला. असंच मग सर्व ठिकाणच्या मिसळी ट्राय करताना माझा संबंध रामनाथशी आला. याला दुसरे कारण म्हणजे माझ्या मित्रांनी पुण्याची खाद्यसंस्कृती हा विषय घेऊन रामनाथ मिसळीवर बनवलेला व्हिडिओ. तो व्हिडिओ पाहून रामनाथला जायचा मोह आवरला नाही. आणि मग एके दिवशी तो सुदिन उगवला जेव्हा मी रामनाथची मिसळ पहिल्यांदा खाल्ली आणि ती चव मला मनापासून आवडली. मी जरी तो व्हिडिओ पाहिला नसता तरी मला रामनाथची मिसळ आवडली असती यात तिळमात्र शंका नाही.

रामनाथची मिसळ आवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे टिकून असलेले जुनेपण. तीच जुनी चव अजूनही अस्तित्वात आहे यातच रामनाथचे मोठेपण दिसून येते. तर्री, शेव, कांदा, आणि जोडीला लिंबू अशा साध्यासोप्या मिसळीच्या मांडणीमुळे ती मिसळ खावीशी वाटते. नव्या पिढीचा विचार करून जर त्यांनी मिसळीत बदल केले असते तर खऱ्या पुणेकराला कदाचित ती मिसळ आवडली नसती पण तरीही त्यांनी तीच चव आणि मिसळ कायम ठेवली म्हणून सगळ्या नव्यापणात सुद्धा त्यांचे जुनेपण अस्सल टिकून आहे. मग जरी आत्ता चुलीवरच्या मिसळीचे फॅड आले तरी ज्याला खरंच मिसळीचा 'गंध' आहे तो जुन्याकडेच जाईल याची मला खात्री आहे.

ता.क. घरगुती, चुलीवरची, तुपातली, झणझणीत, गरमागरम, खरपूस, ठसकेबाज, चवदार, तर्रीबाज, झन्नाटेदार (रामबंधूची कृपा) इत्यादी प्रकारच्या मिसळी खायला कृपया आम्हाला बोलवू नये! जाहीर अपमान करण्यात येईल. आमच्या हदयात रामनाथचे अढळ स्थान आहे. आम्हाला तिकडचीच मिसळ मनापासून आवडते.

रामनाथच्या आधी वेगवेगळ्या मिसळी ट्राय केल्यामुळे त्यातल्या काही निवडक मिसळींची यादी पुढे देतोय! ती कृपया पाहून घ्यावी पण पुण्यात राहात असताना कायम लक्षात ठेवावे की मिसळ खायची असेल तर रामनाथ शिवाय पर्याय नाही!

इकडची मिसळ बरी आहे!

श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग.
काटाकिरर मिसळ, कमिन्स कॉलेज रोड.
मस्ती मिसळ, कर्वे रोड, कोथरुड.


माझ्या मित्रांनी तयार केलेला व्हिडिओची लिंक :

https://youtu.be/idrOkcMQaK8

आणि हो पावापेक्षा ब्रेड बरा!!!!

Sunday, 26 August 2018

पोहे आणि मी!









पुण्यात राहून जर पोहे आवडत नसतील तर पुणेकर असल्याचा खोटा अभिमान कोणीही बाळगू नये असे माझे प्रेमळ मत आहे. पुणेकरांच्या आयुष्यात दिवसाची सुरुवात चहाने झाल्यावर नंतर पोहेच असतात. पुणेकर असल्यामुळे हीच सवय मलाही आहे. शालेय जीवनापासून मी पोहे खायला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच पुणेकर आणि पोहयांचे नाते किती घट्ट आहे याची जाणीव मला झाली.

मी आठवीत असताना 'प्रबोधिनी'जवळच असलेल्या 'उभे' या ठिकाणी पोहे खायचो. गरमागरम चविष्ट सांबर, वर असलेली पिवळी, लाल शेव आणि द्रोणातील चवदार पोहे या गोष्टींमुळे माझा पोहयांकडे ओढा वाढला. दररोज एकदातरी उभेचे पोहे व्हायचे. काही वेळा घरून डबा मिळायचा नाही मग तेव्हा मधल्या सुट्टीत उभेचे पोहे असायचे. साधारण दहावी पर्यंत मी फक्त तिकडचेच पोहे खायचो.

अकरावी-बारावीला जास्त पोहे खायची वेळ आली नाही. ठिकाण बदलल्यामुळे आणि एखाद्याच गोष्टीची आवड निर्माण झाल्यामुळे दुसरीकडे पोहयांची चव ट्राय करायचे धारिष्ट्य केले नाही. पण नंतर फर्ग्युसनला आल्यामुळे नवीन चवी ट्राय करणं मस्ट झालं. म्हणूनच चहाच्या टपरीवर चहाबरोबरच पोहे देखील सुरू झाले. यातच एक पोहयाचे नवीन काहीसे व्हर्जन म्हणता येईल असं खाण्यात आले. आम्ही त्यावेळीस सिंहगड रोडला मित्राच्या घरी रात्री अभ्यास करायला जमायचो. अभ्यासाला जरी जमत असलो तरी खरं कारण वेगळंच असायचे. पहाटे तीन वाजता पोहे खायला आम्ही कमिन्स काॅलेजजवळ जायचो. गरमागरम मटकी सॅम्पल आणि वरती लिंबू पिळलेले पोहे हे पहाटे पहाटे खूप खास लागायचे. आमचे क्वचितच घरी लवकर गेल्यामुळे ते पोहे चुकलेले आहेत पण मुद्दामून त्यांच्यासाठीच रात्र जागवल्याचेही मला आठवत आहे.

कमिन्स बरोबरच कधी लवकर पोहे खावेसे वाटले म्हणजेच १२-१२.३० ला तर कोथरूडला देसाई बंधू आंबेवाल्यांच्या इथे पोहे खायला जायचो. तिकडच्या पोह्यांची चव ओके ओके आहे. कमिन्सच्या आधी अमृतेश्वराला पहाटे पोहे खायला जायचो कारण तेव्हा आम्हाला कमिन्सचा स्पाॅट माहित नव्हता आणि नंतर पुढे पुढे अमृतेश्वराच्या पोहयांची सुद्धा टेस्ट बिघडली. कॉलेजच्या खासकरून शेवटच्या वर्षात भरपूर वेळा कमिन्सवर स्वारी असायची पण नंतर एकदा काॅलेज संपलं आणि ती जागा सुटली.
सध्यातरी आयुष्यात पोहे फक्त घरी खाऊन होतात. मी प्रबोधिनीचाच असल्यामुळे उभेला फक्त प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनीच भेट होते. पण कधी चुकून गेलो तरी आठवीतले आणि आठवणीतले दिवस आठवतात आणि तेव्हाचीच चव जिभेवर रेंगाळते.


ता. क. मला उत्तमप्रकारे पोहे करता येतात आणि मी ते करतोही पण एकदा घरी एकटा असताना अंदाज न आल्यामुळे 'य' प्रमाणात पोहे केले आणि मग त्या दिवशी दिवसभर मी फक्त पोहेच खात होतो. त्यामुळेच मी पोहे करायचे टाळतो! मला आवडणारे पोहे कुठे कुठे मिळतात या जागांची यादी पुढे देऊन ठेवतोय, तिकडचे पोहे कसे वाटले ते जरूर मला कळवा. मी वाट पाहतोय!


इकडचे पोहे मला आवडतात!

  • उभे स्पोर्ट्स, ज्ञान प्रबोधिनी जवळ, राधिका भेळ च्या शेजारी.
  • कमिन्स काॅलेजजवळ (योग्य पत्ता लवकरच अपडेट करतो)
  • देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रोड, कोथरुड. (वेळ बघून जावे, दिवसाढवळ्या फिरकू नये)
  • वैष्णवी स्नॅक्स सेंटर, एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारी, जंगली महाराज रोड.






Saturday, 18 August 2018

चहा आणि मी!


                  
माझ्या जीवनात चहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळची सुरुवात चहाने झाली की माझे दिवसभरात 3-4 चहा होतात. दिवसभर बाहेर असल्यामुळे सकाळचा आणि कधीतरी संध्याकाळचा चहा घरी होतो. चहाचे हे 'गोडव्यसन काॅलेज लाईफ सुरू झाल्यावर लागले आणि यात माझ्या मित्रमंडळीचा फार मोठा वाटा आहे. रोजच्या घडणाऱ्या विविध विषयांवरच्या चर्चाकमाल लेव्हलचे गाॅसिपिंग आणि त्याच्या जोडीला फक्कड चहा यातच माझे काॅलेज जीवन सामावलेले आहे.

मी अकरावी-बारावीला आबासाहेब गरवारेला आर्टस् करत होतो. रेस्ट इअर असल्यामुळे काॅलेजला जाणे फारसे व्हायचे नाही. पण कधीतरी चुकून गेलो तरी गरवारेच्या बाहेर असलेला चहा हमखास व्हायचा. नंतर पुढील शिक्षणासाठी मी फर्ग्युसन घेतले. तिथेच खरे अस्मादिकांना चहाचे व्यसन लागले. मीडियाचे विद्यार्थी असल्यामुळे 'प्रमाणात चर्चा व्हायच्या आणि त्याला ठिकाण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन! तिकडचा चहा फिका वाटत असला तरी चहाची ती चव मला आवडते. आणि मग नंतर फर्ग्युसनच्या चौथ्या गेटपाशी असलेल्या चहाच्या टपरीवर रोजचा चहा व्हायचा. ते ठिकाण निवडण्यामागचे कारण म्हणजे माझ्या डिपार्टमेंटची बिल्डींग त्याच्या जवळ होती आणि खरे कारण म्हणजे अण्णाचे कॅन्टीन फार लांब होते आणि त्याला चालत जायचा मी कंटाळा करायचो.

असं चहाचे ठिकाण निश्चित झाल्यावर कधीतरी सकाळीदुपारी लेक्चर झाल्यावर आणि मग संध्याकाळी कॉलेज झाल्यावर चहाचे प्रोग्राम व्हायचे. फर्ग्युसन मधले माझे जवळपास निम्मे आयुष्य मी त्या चहाच्या टपरीवरच व्यतीत केले. एकूणतः फर्ग्युसन मुळे माझे चहाप्रती असलेले प्रेम अधिक वाढले.

आता फर्ग्युसनमधून मी रानडे मधे पुढील शिक्षणासाठी आलोय आणि त्याचबरोबर आलंय माझे चहाबद्दलचे प्रेम! इथे सध्याच आल्यामुळे इकडे असलेल्या चहाच्या वेगवेगळ्या टपऱ्या मी फक्त ट्राय करतोय. पण अजूनही माझ्या जिभेवर फर्ग्युसनच्या बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर असलेल्या चहाचीच चव रेंगाळत आहे.

ता.क. मला उत्तम प्रकारे चहा करता येतो पण मी तो करायचा कंटाळा करतो याची वाचकांनी नोंद घ्यावी! तसेच मला आवडणार्‍या चहाच्या जागांची यादी मी पुढे दिलेली असून तिकडचा चहा तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला कळवामी वाट पाहतोय!


इकडचा चहा मला आवडतो!

  • फर्ग्युसनमधले अण्णाचे कॅन्टीन.
  • फर्ग्युसनच्या चौथ्या गेट बाहेरील चहाची टपरी.
  • येवले चहाहत्ती गणपती समोर.
  • जय भोलेनाथ टी हाऊसपत्र्या मारूती चौक.